Asia News Beed

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांना निवेदन !

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांना निवेदन !

बीड दि.06 (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा
20% वाढीव टप्पा शासनाने मंजूर केला आहे. शिवाय 01 ऑगस्ट 2025 पासून या शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्यानुसार वेतन देण्याचे शासनाने जाहीर केले. परंतु अद्यापही 20 टक्के वाढीव टप्प्यानुसार या शिक्षकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा झाली नाही. किमान दिवाळी सणाच्या निमित्ताने या सर्व शिक्षकांचे वेतन 20 टक्के वाढीव टप्प्यानुसार व्हावे, त्यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम यांच्यासह वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हयातीलअंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन वाढीव टप्प्यानुसार करा या मागणीचे निवेदन बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम आणि वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांना दिले. त्यानंतर शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील मॅडम पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाल्या की, राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांची दिवाळी गोड करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याप्रमाणे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात आहोत. त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळताच क्षणांचा ही विलंब न करता आपले वाढीव टप्प्याप्रमाणे वेतन देऊन सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे हक्काचे वेतन जमा करू असे आश्वासन दिले. दुसरीकडे वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांना ही निवेदन दिले. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आपली मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली जाईल व वाढीव टप्प्यासाठी लागणारा आवश्यक निधीची मागणी करून अंशतः अनुदानित शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वेतन जमा करणार असल्याचे सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या पूर्वी वाढीव टप्प्याप्रमाणे वेतन खात्यात जमा होणार या
दिलेल्या आश्वासनांमुळे निश्चितच दिवाळी गोड होईल असा विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या निवेदनावर विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, महिला आघाडीच्या मराठवाडा सचिव श्रीमती मुक्ता मोटे मॅडम, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे, प्राचार्य तुकाराम खाडे, बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रताप पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जामकर, अरविंद सौंदलकर, जिल्हा सचिव शेख सर, श्री देशमुख, बीड तालुका अध्यक्ष भागवत यादव, बाळासाहेब नागरगोजे, सय्यद रिजवान, अशोक मोरे, सुरेश कदम, पृथ्वीराज राऊत, नितीन बिनवडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *