शेतकऱ्यांना, नागरिकांना स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे केले आवाहन
बीड दि. १५ (प्रतिनिधी) बीड जिल्हासह शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसाभरपाई देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा तसेच इतर छोटे-मोठे तलाव,नदी,ओढे तुडुंब भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार तसेच बीडच्या जिल्हाधिकारी यांना बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्र देऊन केली आहे.
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि.२८ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या आणि १३ सप्टेंबर २०२५ पासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील उभा असलेला सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिकांचे तथा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी बांधवांच्या पाळीव पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. यासह शहरी व ग्रामीण भागात देखील पावसामुळे मोठी पडझड झाली आहे. आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने विद्युत पोल, तारा व रोहित्र नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना व ग्रामस्थांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी, नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी
पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांना स्वतःच्या आणि आपल्या पशुधनाची सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे तसेच आज दिवसभर अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे
आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
आ.संदीप भैय्यांनी अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना करत तात्काळ पंचनामे करण्यासाठी पत्र दिले
अतिवृष्टीमुळे मतदार संघातील सर्वच तलाव पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जायकवाडी यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांना रस्ते व पुलाचे तात्काळ पंचनामे करणेसाठी पत्र व्यवहार देखील केला आहे.