एशिया न्यूज बीड

माजी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांच्या कुशल व प्रभावी मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांत गो. से. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल

माजी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांच्या कुशल व प्रभावी मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांत गो. से. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल

प्रा. सुभाष वाघ
प्रभारी, कनिष्ठ महाविद्यालय विभाग

खरं तर सुरुवातीच्या काळात, विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित राहत नसत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मात्र, प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर यांनी कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतलेले काही ठोस आणि दूरदर्शी निर्णय हे कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाचे मानकरी ठरले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शैक्षणिक शिस्त, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष प्राधान्य दिले.
विद्यार्थी नियमितपणे वर्गात उपस्थित राहावेत, यासाठी त्यांनी स्पष्ट धोरण स्वीकारले. त्यासाठी नियमित परीक्षा घेणे, परीक्षेचे निकाल जाहीर करणे, ते निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे तसेच त्यांना बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच नियमित प्रात्यक्षिके झाली पाहिजेत, यासाठीही त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. सुरुवातीच्या काळात कडक धोरण स्वीकारल्यामुळे बदलत्या काळानुसार त्याचा परिणाम प्रवेशावर विपरीत होईल, अशी भीती सरांना तसेच मलाही वाटत होती. परंतु, प्रत्यक्षात या धोरणाचा सकारात्मक परिणाम झाला आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशसंख्या वाढली.
इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी बारावीच्या प्रवेशासाठी ग्रामीण भागातील इतर महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी टी.सी. घेण्याकरिता महाविद्यालयात येत असत. परंतु, प्राचार्य सरांनी कितीही दबाव—राजकीय किंवा सामाजिक—आला तरी त्याला बळी न पडता महाविद्यालयातून टी.सी. बाहेर जाण्याचे प्रकार थांबविले. आनंदाची बाब म्हणजे, जिथे दरवर्षी जवळपास ४० ते ५० विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर जात असत, तिथे हे प्रमाण केवळ चार ते पाच विद्यार्थ्यांपर्यंत आले. याचे सर्व श्रेय आदरणीय साहेबांना जाते.
कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक परीक्षेच्या वेळी प्राचार्य साहेब स्वतः पाहणी करून जात असत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असत. त्यांच्या या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम महाविद्यालयाच्या निकालावरही झाला. दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी फास्ट-ट्रॅक बॅचचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. याचा मोठा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला आणि अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळविता आला. गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशावरही दिसून येत आहे.
कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयाने जे यश संपादन केले, त्यामध्ये प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सरांचा मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार एका विद्यार्थिनीला प्राप्त करून देण्यातही साहेबांचे मोलाचे योगदान राहिले आहे. क्रीडा क्षेत्रात तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर कनिष्ठ महाविद्यालयाने जे यश संपादन केले, त्यामध्ये प्राचार्य साहेबांचा फार मोठा वाटा आहे.
विद्यार्थ्यांशी असलेली त्यांची जवळीक आणि संवाद साधण्याची पद्धत यामुळे ते खऱ्या अर्थाने विद्यार्थीप्रिय प्राचार्य ठरले. अगदी अकरावीपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याने रात्री कितीही वाजता फोन केला, तरी न चिडता व संयमाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कसब साहेबांकडे होते. हेच तंत्र त्यांनी आपल्या सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशीही जपले. त्यांना केव्हाही फोन केला की त्यांचा परत फोन येईलच, याची सर्वांना खात्री असायची. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.
कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र प्राध्यापक कक्ष, विभागप्रमुखांसाठी स्वतंत्र केबिन, कॉम्प्युटर व इंटरनेटची सुविधा, दस्तऐवज ठेवण्यासाठी आवश्यक कपाटे व अलमाऱ्या तसेच प्राध्यापकांसाठी आरामदायी खुर्च्या या सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालय विभागात NEET व JEE परीक्षांसाठी एक स्वतंत्र छोटीशी लायब्ररीदेखील उभी करण्यात आली.
‘नो युवर कॉलेज’, पालक सभा, निरोप समारंभ, कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्नेहसंमेलन तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक विचारवंत व नामवंत व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्तरावर दिली जाणारी शिष्यवृत्ती ही संकल्पनादेखील त्यांनी अस्तित्वात आणली. या शिष्यवृत्तीचा अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
आज अनेक महाविद्यालयांना प्रवेशासाठी वन-वन भटकावे लागत आहे; परंतु साहेबांच्या दूरदर्शी व परिणामकारक धोरणामुळे गेल्या पाच वर्षांत कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. याचे सर्व श्रेय आदरणीय साहेबांना जाते.
खरं तर साहेब आज प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांनी आम्हाला कार्य, कर्तृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समर्पणाचा जो संदेश दिला आहे, तो आम्ही निश्चितच पुढे नेऊ. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीची ही वाटचाल पुढे सुरू ठेवण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालय निश्चितच करेल.
एक संयमी, अभ्यासू, प्रामाणिक, नेतृत्वगुणसंपन्न, हजरजबाबी, उत्तम निर्णयक्षमता असणारे, चांगले वक्ते आणि आदर्श व्यक्तिमत्त्व लाभलेले पुरोगामी विचारांचे प्राचार्य आम्हाला लाभले, ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा लाभ आम्हाला सदैव स्मरणात राहील. त्याबद्दल तळवणकर सरांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद!
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजय वराडे सरांना शुभेच्छा
नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजय वराडे सर यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल अधिक यशस्वी, प्रगतिशील आणि गौरवशाली होईल, असा आशावाद व्यक्त करतो.
डॉ. संजय वराडे सरांना त्यांच्या भावी प्रशासकीय व शैक्षणिक कारकिर्दीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक- प्रा. सुभाष वाघ प्रभारी, कनिष्ठ महाविद्यालय, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी,कनिष्ठ महाविद्यालय विभाग, गो. से. महाविद्यालय, खामगाव

contributor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *