विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या प्राचार्य, HOD, ग्रंथपाल व शिक्षकांच्या भूमिका; उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव
खामगांव :- गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, प्रशासकीय कौशल्य, शिस्त व जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने शिक्षक दिनानिमित्त ‘Peer-Learning Day’या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रशासन व शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी प्रत्यक्ष स्वीकारून स्वशासनाचा अनुभव घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. डी. एन. व्यास, डॉ. एम. एस. गायकवाड, डॉ. पी.पी. ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, निर्णयक्षमता, आत्मविश्वास व जबाबदारीची भावना विकसित होते, असे प्रतिपादन केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्राचार्य, विभागप्रमुख (HOD), सहायक तसेच ग्रंथपाल, शिक्षक यांच्या भूमिका पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी विभागीय नियोजन, प्रशासन, व्यवस्थापन आणि शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी उत्साहाने सांभाळली. उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविणे’हा उपक्रम. M.Com. च्या विद्यार्थ्यांनी B.Com.च्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. तसेच B.Com.च्या विद्यार्थ्यांनीही कनिष्ठ व त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका स्वीकारून अध्यापन, वर्गव्यवस्थापन, प्रश्नोत्तर व विद्यार्थ्यांशी संवाद प्रभावीपणे साधला. या उपक्रमात एकूण 29 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रशासन, अध्यापन व सहाय्यक कर्मचारी अशा विविध जबाबदाऱ्या स्वीकारून प्रत्यक्ष कार्यानुभव मिळविला. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचे, नेतृत्वगुणांचे, अध्यापन कौशल्याचे आणि जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीचे मूल्यमापन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पायल भारसाकले (M.Com. प्रथम वर्ष), श्वेता रत्नाकर (B.Com. तृतीय वर्ष) आणि विधी वाघ (B.Com. द्वितीय वर्ष) यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रेश्मा मारवाडी, प्रा.प्रताप लालवानी, प्रा. अर्चना पाटील, प्रा. पूजा बेद्रे,प्रा. रवीना छटवानी, प्रा. जयश्री हेडा, प्रा. रुचिका कारंजकर,प्रा.सुरज ठेंग, प्रा. अक्षय सिडाम प्रा, एस. व्ही.पाटील, प्रा. वडोदे प्रा. सरिता माळी यांचे सहकार्य लाभले. तसेच Peer-Learning Committee चे सदस्य आणि सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. ‘Learning by Doing’ संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित, शैक्षणिक व प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘ Peer-Learnig Day’ यशस्वीरीत्या संपन्न झाला.