*शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांची अज़ीज़पुरा केंद्र बीड च्या केंद्रप्रमुख पदी नियुक्ती*
*उच्च विद्या विभूषित शिक्षिकेवर समाजातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव*
बीड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद बीड च्या शिक्षण विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या उत्कृष्ट अध्यापनातून विद्यार्थ्यांना विद्यादान करणाऱ्या उच्च विद्या विभूषित शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांची नुकतीच अज़ीज़पुरा केंद्र, बीड केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याला केंद्र प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर अजून जास्तीची झळाळी मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
शेख सलमा बेगम अब्दुल रशीद या २०११ साली जिल्हा परिषद शिक्षण विभागात सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यांचे शिक्षण एम.ए. (इंग्रजी), एम.एस.सी. (केमिस्ट्री), डी.एड, बी. एड, डी.एस.एम., सी.पी.सी.टी. पर्यंत झालेले आहे. लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून अत्यंत साध्या व सुलभ पद्धतीने त्यांनी पहली उडान नावाचे पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकाला मोठमोठ्या शिक्षण तज्ञांकडून गौरविले गेले आहे.
आतापर्यंत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु, सुरंगळी, ता.भोकरदन, जि.जालना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महारटाकळी, ता.गेवराई, जि.बीड. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मोंढा, ता.गेवराई, जि. बीड आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कन्या उर्दू बीड येथे सहशिक्षिका व चार वर्ष मुख्याध्यापिके चा उत्कृष्टपणे पदभार सांभाळत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत कर्तव्य बजावले आहे.
त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनाची नोंद घेत विविध संस्था व संघटनांकडून त्यांना आतापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पातळीवर १२ आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
अशा कर्तबगार सहशिक्षिका शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांनी विभागीय स्पर्धा परीक्षे मध्ये घवघवीत यश मिळवून दिनांक ७ जुलै २०२६ रोजी केंद्रप्रमुख पदाला गवसणी घातली आहे. आता त्यांच्या खांद्यावर केंद्रप्रमुख म्हणून अज़ीज़पुरा केंद्र अंतर्गत येणाऱ्या ९५ शाळांची जबाबदारी राहणार आहे. ज्यामध्ये ऊर्दू माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळांचा समावेश आहे. शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांनी आतापर्यंत जसे कर्तव्यदक्ष राहून कार्य केले आहे, यापुढेही त्यांच्या हातून केंद्रप्रमुख म्हणून असेच कर्तव्य त्या नक्कीच पार पाडतील अशा अपेक्षा व्यक्त होत असून समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


