पाठ्यपुस्तकातील ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधून अनेक कवी, लेखक निर्माण होतील.
-शिक्षक आमदार विक्रम काळे
बीडमध्ये ‘प्रत्यक्ष कवी-लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ उपक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन;
शिक्षक दरबारात प्रश्नांचा पाढा
बीड दि.०५(प्रतिनिधी) : पाठ्यपुस्तकात ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, तेच कवी आणि लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि लेखनकौशल्याला नवी दिशा मिळेल. या नावीन्यपूर्ण उपक्रमातून भविष्यात अनेक नवे कवी आणि लेखक घडतील, मराठी भाषा अधिक समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाची गोडी वाढून परीक्षेतील निकालाचा टक्काही निश्चितच उंचावेल, असा विश्वास मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांनी व्यक्त केला.
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने मराठवाड्यातील ४० शाळांमध्ये बालभारतीच्या ‘पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष कवी/लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता द. बा. घुमरे विद्यालय, बीड येथे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर लाडके शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी
शिक्षणामुळेच माणसाचा विकास होतो. प्रगती होते. शिक्षण माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देते. शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास, प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडते. त्यामुळे चांगला अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा आणि शाळेत नियमित उपस्थित राहा असे मौलिक मार्गदर्शन केले.
मराठी विषयात एकही विद्यार्थी नापास होऊ नये दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९४ हजार ४०० विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत,ज्या मातृभाषेत आपण वाढलो, त्या मराठी भाषेला इंग्रजी आणि गणिता इतकेच महत्त्व दिले पाहिजे असे आवाहन शिक्षकवृंदाला केले. मराठी विषयात एकही विद्यार्थी नापास होऊ नये, या उद्देशाने मराठवाड्यातील ४० आणि बीड शहरातील सहा शाळांमध्ये हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या उपक्रमामुळे पाठ्यपुस्तकात ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो, तेच कवी आणि लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि लेखनकौशल्याला नवी दिशा मिळेल. या नावीन्यपूर्ण उपक्रमातून भविष्यात अनेक नवे कवी आणि लेखक घडतील, असा विश्वास मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांनी व्यक्त केला.
बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘कौतुकाची थाप’ इ.४ थी या पाठाचे प्रत्यक्ष लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांनी द.बा .घुमरे पब्लिक स्कूल, यशवंत विद्यालय, शिवाजी विद्यालय, आदर्श विद्यालय, छत्रपती राजश्री शाहू विद्यालय ,इंदिरा विद्यालय या सहा शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, शिक्षकासोबत ‘कौतुकाची थाप’ या पाठावर दिलखुलासपणे चर्चा केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली. प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील लेखकाला पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच शाळेत पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला जाणार असून लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी येथे प्रा. रामदास केदार (गीत मराठी गाऊ या इ.६वी) , नांदेड कवी सुरेश सावंत (अंतराळवीर इ.३री) तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथे अय्युब पठाण लोहगावकर (कौतुकाची थाप, इ.४थी) हे सर्व साहित्यिक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला जाऊन पाठ्यपुस्तकातील पाठावर, कवितेवर विद्यार्थी, शिक्षकासोबत दिलखुलासपणे चर्चा करीत आहेत. ‘पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण मराठवाड्यात करण्यात आलेले असून आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात शाळेत, जालना जिल्ह्यातील सात शाळेत, बीड जिल्ह्यातील सात शाळेत, धाराशिव जिल्ह्यातील सात शाळेत अशा एकूण २८ शाळेत हा उपक्रम पूर्ण झालेला असून लगेचच लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील शाळेमध्ये हा उपक्रम सुरू होणार आहेत.
‘कौतुकाची थाप’च्या लेखकाची विद्यार्थ्यांशी दिलखुलास भेट!
उद्घाटनानंतर इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘कौतुकाची थाप’ या पाठाचे लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांनी द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, यशवंत विद्यालय, शिवाजी विद्यालय, आदर्श विद्यालय, छत्रपती राजर्षी शाहू विद्यालय आणि इंदिरा विद्यालय या सहा शाळांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुस्तकाच्या पानांवर ज्या लेखकाचे साहित्य वाचले, तोच लेखक आपल्या समोर प्रत्यक्ष उभा असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांनी लेखकांना त्यांच्या लेखनप्रवासापासून ते ‘कौतुकाची थाप’ या पाठाच्या निर्मितीपर्यंत विविध प्रश्न विचारले. लेखक अय्युब पठाण लोहगावकर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय सहज, सोप्या आणि दिलखुलास शैलीत उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या भेटीमुळे ‘लेखकही आपल्यासारखाच एक माणूस आहे आणि आपणही लिहू शकतो’ हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक कवी, लेखक निर्माण होतील असा विश्वास शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
मराठवाड्यात उपक्रमाची धडाकेबाज घोडदौड
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील २८ शाळांमध्ये उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. आता लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत या उपक्रमाची सुरुवात होत आहे.
या उपक्रमात प्रा. रामदास केदार (‘गीत मराठी गाऊ या’ – इयत्ता सहावी), कवी सुरेश सावंत (‘अंतराळवीर’ – इयत्ता तिसरी) आणि लेखक अय्युब पठाण लोहगावकर (‘कौतुकाची थाप’ – इयत्ता चौथी) हे विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधत आहेत.
शिक्षक दरबारात प्रश्नांचा पाढा; आमदार काळेंकडून पाठपुराव्याचे आश्वासन
विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी आणि संवादानंतर दुपारी ४ वाजता स्काऊट भवन, बीड येथे आमदार विक्रम काळे यांच्या पुढाकाराने ‘शिक्षक दरबार’ पार पडला. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांचा पाढा थेट आमदारांसमोर मांडला.
यावेळी विनाअनुदानित शाळांना अनुदान, अंशतः अनुदानित शाळांना १ एप्रिल २०२७ पासून पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा, जुनी पेन्शन योजना, B.L.O., जनगणना, S.R.S. यांसारख्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, डिजिटल शाळा तसेच विविध सेवाविषयक प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन आणि संबंधित प्रशासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिले.
विद्यार्थ्यांच्या हातात लेखणी, शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार!
एकाच दिवशी विद्यार्थ्यांसाठी ‘पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष कवी/लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ आणि शिक्षकांसाठी ‘शिक्षक दरबार’ असे दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून आमदार विक्रम (बप्पा) काळे यांनी शिक्षण क्षेत्राशी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण करण्याबरोबरच शिक्षकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, वेतन अधीक्षक राजेश खटावकर, दीपक घुमरे, गणेश वाघ, विपुल काळे, रवींद्र खोड, बाळासाहेब मुळे,कल्याणराव वाघमारे, प्रदीप विखे, एम. एम. खुटे, नवनाथ म्हात्रे, संजय शिंदे, पाखरे, आत्माराम वाव्हळ, प्रतिभा आडसुळे यांच्यासह मराठवाड्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


