⋅कर्जमाफी व पीक विम्यासाठी कृषी मंत्र्यांना जाब विचारणार – नुमान अली चाऊस
माजलगाव, प्रतिनिधी : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या उद्या होणाऱ्या माजलगाव दौऱ्यादरम्यान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर त्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्याप कर्जमाफी व पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करत, सरसकट विना अट रु. २ लाखांची कर्जमाफी लागू करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले रु. ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वाढवून रु. १ लाख करण्यात यावे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार पीक विम्याची रु. १७,५०० प्रति हेक्टर मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत. उद्या माजलगाव दौऱ्यात कृषी मंत्र्यांकडे या सर्व मागण्या मांडून त्यांना जाब विचारला जाईल. अन्यथा संपूर्ण बीड जिल्ह्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नुमान अली चाऊस यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


