शहा अल्पसंख्याक संस्थेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; नाले स्वच्छता व भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीच्या कारवाईची मागणी
बीड | प्रतिनिधी
शहा अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील विविध नागरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मा. जेबा शेख यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात बीड जिल्ह्यात पावसाळ्याचे आगमन होत असल्याने शहरातील नाल्यांची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शाळा, महाविद्यालय परिसर आणि बसस्टँड परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या समस्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यामध्ये मा. अब्दुल कदीर शेख, मा. जावेद शेख आणि मा. अरबाज खान यांची प्रमुख उपस्थिती होती.


