दरोडा व गंभीर मारहाण प्रकरणात पाच आरोपींची निर्दोष मुक्तता
ॲड. आदित्य राख यांचा प्रभावी युक्तिवाद; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
बीड दि. १२(प्रतिनिधी) : दरोडा टाकून गंभीर मारहाण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ॲड. आदित्य ए. राख यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद निर्णायक ठरल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीने उमेश भोसले व इतर चार जणांविरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दिनांक 30 जुलै 2024 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करून दरोडा टाकला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईप आणि चाकूच्या साहाय्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच घरातील सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(6) व 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, खटल्यादरम्यान सादर झालेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती तसेच आरोपींच्या बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतले. तसेच अँड. आदित्य राख यांनी सखोल कायदेशीर अभ्यासावर आधारित युक्तिवाद सादर करत सरकार पक्षाचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झालेला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, उपलब्ध पुरावे व प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद करत सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. आदित्य ए. राख यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रवीण राख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच
ॲड. जे. एल. पठाण, ॲड. एम. ए. तांबोळी, ॲड.आर. एस. कोरडे, ॲड. डी. व्ही. जाधव, ॲड.पालवे आणि ॲड. शलभ राख यांनीही सहकार्य केले.


