मिलिया गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बीड येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
बीड (प्रतिनिधी) : मिलिया गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बीड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या निमित्ताने प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमन-ए-इशाअत-ए-तालीमच्या सचिव तथा प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सौ. खान सबीहा बाजी उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सौ. सबीहा बाजी म्हणाल्या की, “शिस्त आणि सातत्य हे विद्यार्थ्यांचे खरे सामर्थ्य आहे.” जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग असून कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी, मेहनत आणि दृढनिश्चय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते मर्यादित न राहता ज्ञानप्राप्तीची आवड जोपासावी व नियमित अभ्यासाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सिद्दीकी मोहम्मद इरफान सादुल्लाह यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळेचे वातावरण अत्यंत आनंददायी होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपमुख्याध्यापक खुर्शीद अहमद, पर्यवेक्षिका नसरीन फरहाना तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काझी अर्शिया यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


