शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUI कडून जोरदार मागणी; बीड जिल्ह्यात आंदोलन तीव्र करणार — मुशर्रिफ शेख (प्रदेश सचिव, महाराष्ट्र NSUI)
बीड:
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची झालेली दुरवस्था, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार याला पूर्णपणे राज्य सरकार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे जबाबदार आहेत. शिक्षणाचा उडालेला बोजवारा पाहता, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश NSUI च्या आदेशानुसार महाराष्ट्र NSUI चे प्रदेश सचिव मुशर्रिफ शेख यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयात सरकारची भूमिका उदासीन राहिली असून, सामान्य व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. या निष्काळजीपणाचा आणि ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून NSUI बीड जिल्ह्यात आक्रमक पवित्र्यात उतरली आहे.
बीड जिल्ह्यातील समविचारी संघटनांशी चर्चा सुरू:
मुंबईतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातही सर्व विद्यार्थी संघटना, युवक संघटना आणि समविचारी संस्थांसोबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. सर्वांना एकत्र आणून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जिल्हाभरात व्यापक आंदोलन उभारले जाईल, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भूमिका मांडून जनजागृती केली जाईल.
जर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही, तर बीड जिल्हा NSUI च्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल, असा इशारा प्रदेश सचिव मुशर्रिफ शेख यांनी दिला आहे.


