शालेय जीवनातील संस्कार हीच भविष्यातील यशाची खरी शिदोरी
– श्री गणेश वाघ
- बीडमधील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप
बीड दि.२१ (प्रतिनिधी): शालेय जीवनातील मैत्री आणि संस्कार हीच भविष्यातील यशाची खरी शिदोरी असून याच शिदोरीवर विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश वाघ सर यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव वाघ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. या वेळी व्यासपीठावर सौ. दीपाताई वाघ, दत्तात्रय चव्हाण सर ( मु.अ.) आणि मारोती चिल्लेवाड सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत गाऊन तसेच पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या कार्यक्रमानंतर श्रेया कदम, अर्चना सोनवणे व प्रीती कांबळे यांनी शिवजयंतीनिमित्त आपले विचार मांडले. तसेच सहशिक्षिका श्रीमती साळुंके मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्या नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. दीपाताई वाघ म्हणाल्या की,“दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील वळण देणारे महत्वाचे आहे. या काळात आपण प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर यश संपादन करावे,” असे मौलिक मार्गदर्शन करत पुढील शिक्षणासाठी व आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना श्री गणेश वाघ सर म्हणाले की,“शालेय जीवनात मैत्री आणि संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. या जीवनात चांगली मैत्री आणि चांगले संस्कार मिळणे आवश्यक असते. चांगले मैत्री आणि संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील शिदोरी आहे. याच शिदोरीवर भविष्यातील यश अवलंबून असते. त्यामुळे चांगली मैत्री आणि चांगले संस्कार हेच भविष्यातील यशाची खरी शिदोरी आहे. ही शिदोरी आपण सोबत घेऊन पुढील जीवन यशस्वी करावे. त्याच बरोबर
आज कालची मुले मोबाईलच्या अधीन झालेले आहेत. मोबाईलचे फायदे जेवढे आहेत तेवढेच तोटे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून आपले सर्व लक्ष अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आई-वडील तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे शेवटी विद्यार्थ्यांना गणेश वाघ सर यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाव्हळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना रूचकर भोजन देण्यात आले.
रंगभरण स्पर्धेतील बक्षीसांचे
मान्यवरांच्या हस्ते वितरण!
शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव वाघ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. ज्ञया स्पर्धेतील प्राथमिक गटातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. संध्या कवठेकर (रु. 1000 व प्रमाणपत्र) आणि द्वितीय क्रमांक मिळालेल्या कु. शुभेच्छा कदम (रु. 500 व प्रमाणपत्र) देऊन कौतुक करण्यात आले. तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रेया कदम ( प्रमाणपत्र आणि रोख रु. 1000), द्वितीय क्रमांक मिळालेल्या आरोही अतुल भडगळे हिस ( प्रमाणपत्र आणि रोख रु. 500) तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या कु. अदिती घुमरे ( प्रमाणपत्र आणि रोख रु. 300 रूपये) असे पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.


