आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात २ हजार ४०० विद्यार्थ्यांना मिळणार आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश – मनोज जाधव
पोद्दार इंग्लिश स्कूलचे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा – मनोज जाधव
बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आज मंगळवार (दि. १७ फेब्रुवारी) पासून सुरुवात होत आहे. त्यानुसार पालकांना मुलांचे अर्ज १० मार्चपर्यंत भरता येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ९ जानेवारी रोजी शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. मुदतवाढीसह ही प्रक्रिया ३० जानेवारी रोजी बंद करण्यात आली. जिल्ह्यात प्रवेशासाठी २१३ शाळांची नोंदणी झाली असून २ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असून पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज वेळेत दाखल करावेत, असे आवाहन मनोज जाधव यांनी केले आहे.
पोद्दार इंग्लिश स्कूलचे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा – मनोज जाधव
पोद्दार इंग्लिश स्कूलने आरटीई प्रवेशातून पळवाट काढण्यासाठी अल्पसंख्यांक प्रमाणपत्र घेतले असून हे प्रमाणपत्र नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आरटीई प्रवेश टाळण्यासाठी अशा प्रकारे प्रमाणपत्र देणे चुकीचे असल्याचे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व शिक्षण संचालक यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित शाळांना देण्यात आलेले अल्पसंख्यांक प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे, अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे.
चौकट
यंदा कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य
आरटीई प्रवेशासाठी काही पालकांकडून कागदपत्रांमध्ये अफरातफर झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य केले आहे.
चौकट २
महत्त्वाच्या सूचना
• आरटीई पोर्टलवर निवासस्थानापासून १ कि.मी. किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळांची माहिती दिसेल.
• एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास कोणताही अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
• पालकांना किमान दहा शाळांची निवड करावी लागेल.
• केवळ मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे.
• चुकीची माहिती दिल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करण्यात येईल.
• अर्ज भरताना निवासस्थानाचा पत्ता अचूक नमूद करणे आवश्यक आहे.
चौकट ३
ही कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य
१) आई किंवा वडिलांचे आधार कार्ड
२) बालकाचे जन्मप्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा
३) भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत (सर्व संबंधित घटकांसाठी अनिवार्य)
४) सामाजिक वंचित घटकांसाठी – पालकांचा/बालकाचा जात दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र (परराज्यातील जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.)
५) आर्थिक दुर्बल घटकांसाठी – पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये एक लाखांपेक्षा कमी (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षांतील दाखला ग्राह्य)


