एशिया न्यूज बीड

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध!  पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध!   पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! 

  • पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’

पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला

बीड दि.30 (प्रतिनिधी): रक्षणकर्तेच जेव्हा हतबल ठरतात, तेव्हा सामान्यांनी कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल बीडमधील पत्रकार आत्माराम वाव्हळ यांच्या एका ‘श्रद्धांजली’ पोस्टरमुळे उपस्थित होत आहे. तब्बल १४-१५ वर्षे विनाअनुदानित शाळेत विना पगारी काम करून, एक-एक रुपया जमवून त्यांनी घेतलेली त्यांची ‘ हिरो होंडा स्प्लेंडर MH-23 AS 9255’ या क्रमांकाची मोटारसायकल आणि गेल्या वर्षी 28 मार्च 2025 रोजी ‘ओप्पो Reno 8’ कंपनीचा स्मार्टफोन चोरीला गेला होता. परवा त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले, तरीही त्याचा तपास लागला नाही, तब्बल एक वर्षानंतर आता पोलिसांच्या तपासावर विसंबून न राहता वाव्हळ सरांनी चक्क आपल्या लाडक्या मोबाईलचे ‘श्राद्ध’ घालत सोशल मीडियावरून आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.

2017 पासून सुरु असलेला ‘तक्रारींचा’ प्रवास

बीड शहरातील पत्रकार आत्माराम

वाव्हळ सरांनी अत्यंत कष्टाने घेतलेली ‘ हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची MH-23 -AS -9255’ या क्रमांकाची मोटारसायकल 2017 साली चोरीला गेली होती. यासंदर्भात त्यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले. अखेर, बरोबर एक वर्षांनी त्यांनी 2018 मध्ये जड अंतःकरणाने आपल्या त्या लाडक्या दुचाकीचे ‘श्राद्ध’ घातले होते. ही घटना त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.

आता ‘शिवाजीनगर’ पोलिसांच्या दप्तरीही फक्त कागदच!

दुचाकीच्या चोरीनंतर सावरून आत्माराम वाव्हळ सरांनी पुन्हा कष्टाने पैसे जमवून नव्याने दुसरी मोटरसायकल खरेदी केली.

दरम्यान आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येक नागरिकांची काळाची गरज निर्माण झाली आहे. शिवाय प्रत्येक पत्रकारांना बातम्यांच्या संदर्भात अपडेट राहण्यासाठी पत्रकारांकडे स्मार्टफोन असणे फार गरजेचे झाले आहे. त्यामुळे त्यांनी Oppo Reno 8 कंपनीचा काळ्या रंगाचा स्मार्टफोन खरेदी केला होता. मात्र, अवघ्या काही दिवसातच म्हणजेच दिनांक 28 मार्च 2025 रोजी त्यांच्या या मोबाईलवरही चोरांनी डल्ला मारला. या चोरीची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून, विनंती करूनही तपास यंत्रणेने कोणतीही हालचाल केली नाही. वर्षभर पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही काहीच साध्य झाले नाही.

वरिष्ठांकडे विनंती करूनही पदरी फक्त निराशाच

“वारंवार पोलीस खात्यातील वरिष्ठांशी संपर्क साधला, मोबाईल आणि मोटरसायकलचा तपास लावण्याची विनंती केली, पण यंत्रणेने काहीच केले नाही. शेवटी हतबल होऊन मी हे पाऊल उचलले आहे,” अशी भावना आत्माराम वाव्हळ यांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियातून यंत्रणेच्या डोळ्यात अंजन

पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आत्माराम वाव्हळ सरांनी या मोबाईललाही परवा दिनांक 28 मार्च 2026 रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ वाहणारे पोस्टर सोशल मीडियात प्रसिद्ध केले आहे. “अखेरचा ठावठिकाण: अज्ञात” असे लिहित त्यांनी आपल्या मोबाईलशी अगदी एका निर्जीव वस्तूशी असलेला आपला जिव्हाळा आणि पोलीस यंत्रणेबद्दलची चीड व्यक्त केली आहे. एका पत्रकारालाच आपल्या चोरीला गेलेल्या वस्तूंच्या तपासासाठी असे ‘श्राद्ध’ घालावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय? असा खडा सवाल आता बीडकर विचारत आहेत.

मिश्किल प्रतिक्रियेचे कौतुक!

पत्रकार आत्माराम वाव्हळ यांनी आपल्या हरवलेल्या वस्तूबाबत व्यक्त केलेली ही हळवी पण मिश्किल प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोबाईलमधील डेटा आणि कामाच्या आठवणी आता परत येणार नाहीत, याची जाणीव असल्याने त्यांनी ही अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी “स्मार्टफोनची अशी एक्झिट पहिल्यांदाच पाहिली,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *