तहसीलदार शेळके यांच्या हस्ते जिव्हाळा केंद्रात बेघरांना अनुदान मंजुरीपत्र वाटप ; वयोवृद्धांचे भावनिक आशीर्वाद
जिव्हाळा केंद्रामध्ये निराधार व निराश्रीत नागरिकांसाठी दिलासा देणारे मंजुरी आदेश वितरण कार्यक्रम अत्यंत आपुलकीच्या आणि भावनिक वातावरणात पार पडला .
श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकृत मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले . या कार्यक्रमामुळे अनेक वयोवृद्ध , दिव्यांग , निराधार आणि गरजू नागरिकांच्या जीवनात आर्थिक आधाराची नवी आशा निर्माण झाली .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कनवाळू आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे जिल्ह्यातील दुर्बल घटकांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचत आहेत . गरजूंपर्यंत शासनाचा हात पोहोचावा , या उद्देशाने त्यांनी सातत्याने प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी जिव्हाळा केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत विशेष जिव्हाळा दाखवत “ जास्तीत जास्त करून दाखवण्याची ” भूमिका घेतली असून निराधार नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे .
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे बेघर आणि निराधार घटकांविषयी विशेष आपुलकी व्यक्त करत त्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे असे मत मांडत असतात . उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही गरीब आणि गरजू घटकांप्रती कनवाळू दृष्टिकोन ठेवत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज अधोरेखित केली आहे .
समाजातील बेघर , अनाथ , अपत्यहीन , निराधार , निराश्रीत वृद्ध व्यक्तींसाठी जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून हे केंद्र रेणुका माऊली सेवाभावी संस्था व नगर परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने चालविले जात आहे . या केंद्रामध्ये स्वतंत्र इमारत असून त्यामध्ये स्वयंपाक गृह , भोजन कक्ष , कोठीघर यांसह दोन मजली इमारतीत कार्यालय , स्नानगृहे व मुबलक प्रमाणात शौचालये उपलब्ध आहेत . याशिवाय मनोरंजन कक्ष , वैद्यकीय सेवा , वाचनालय , बाग-बगिचा तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करण्यात आलेली आहे .
येथे प्रत्येक राहणाऱ्या बेघर व्यक्तीस झोपण्यासाठी पलंग , सतरंजी , गादी , उशी , बेडशीट , चादर , कपाट , ब्लॅंकेट यांची सुविधा देण्यात येते . तसेच ताट , वाटी , तांब्या , बादली यांसारख्या मूलभूत गरजांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे . रस्त्याच्या कडेला , बसस्थानक परिसरात , पुलाखाली किंवा अडचणीच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या निराधार नागरिकांना या केंद्रात प्रवेश देण्यात येतो . त्यामुळे बेघरांना सुरक्षित निवारा मिळण्यास मदत होत आहे .
या कार्यक्रमात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते मदन मारोती जाधव , रघुनाथ वामन वाघमारे , मुमताज कटाळु शेख , रामकिसन महादेव पुरी , अरविंद दत्तात्रय राजंकर , शिवाजी यशवंता शिंदे , बाली बारीक सारूक , रईसा मेहमुद पठाण , अनिल चंद्रकांत साळवे आणि सुशाला अशोक जाधव या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित करण्यात आले . मंजुरी आदेश मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसून आले .
कार्यक्रमादरम्यान जिव्हाळा केंद्रातील वयोवृद्ध आजी-आजोबांनी भावनिक वातावरणात तहसीलदार शेळके यांना मनःपूर्वक आशीर्वाद दिले . “ आम्हाला शासनाचा आधार मिळाला , आता जगण्याला आधार मिळाला ” अशा भावना व्यक्त करत काही वयोवृद्धांनी कृतज्ञता व्यक्त केली . याच वेळी जिव्हाळा केंद्रातील लाभार्थी वैजंता बाई जावळे यांनी विठ्ठलाचे मंत्रमुग्ध करणारे गीत सादर केले . त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण सभागृह भारावून गेले आणि उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले . त्या क्षणी वातावरणात संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना प्रकर्षाने जाणवली .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या मनोगतात सांगितले , “ निराधार बांधवांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे . शासनाच्या योजना योग्य पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचणे हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे . कुणीही वंचित राहू नये , हा आमचा प्रयत्न आहे . ” त्यांनी पुढे स्पष्ट केले की लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करणे , मतदार नोंदणी पूर्ण करणे , उत्पन्न दाखले किंवा इतर आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय सज्ज आहे . “ कागदोपत्री अडचणींमुळे कोणाचाही लाभ अडू देणार नाही , गरज असेल तर विशेष शिबिर घेऊन सर्व कामे पूर्ण करू , ” असे आश्वासन त्यांनी दिले .
कार्यक्रमास नायब तहसीलदार अण्णा वंजारे , सुहास हजारे , प्रशांत सुपेकर , पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ गुळभिले , जिव्हाळा केंद्राचे संस्थापक अभिजीत वैद्य , राजू वंजारे, प्रोबेशनर अधिकारी श्री पवळ , मधुकर बीलगे , गणेश केकाण , अजय चव्हाण , अमोल बडगुजर , चंद्रकांत तोडकर , मंडळ अधिकारी अनिल तांदळे , तलाठी शब्बीर पठाण , सहायक महसूल अधिकारी हेमलता परचाके , महसूल सहायक वैशाली बहिरवाळ , ज्योती कापसे , महेंद्र राऊत , छाया सरवदे , दिनेश कोरडे , आकाश शेळके , कैलास गायकवाड , सतीश जाधव आणि जिव्हाळा केंद्र , तहसील कार्यालय व नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
या योजनांमुळे निराधार , वृद्ध , दिव्यांग आणि गरजू घटकांना आर्थिक सहाय्य मिळणार असून शासनाच्या सामाजिक बांधिलकीचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे . “ जिथे माणुसकी , तिथे देव ” या म्हणीप्रमाणे प्रशासनाने दाखवलेली संवेदनशीलता आणि जिव्हाळा हा या कार्यक्रमाचा आत्मा ठरला . एकूणच जिव्हाळा केंद्रातील हा उपक्रम केवळ मंजुरी आदेशांचे वितरण नव्हता , तर आशेचा आणि आधाराचा उत्सव होता .
तहसीलदार शेळके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या कनवाळू भूमिकेमुळे निराधार नागरिकांच्या आयुष्यात नवे समाधान फुलल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली .


