*‘श्री गजानन नागरी सहकारी बँक नफ्यात; दुपटीने वाढ;’ग्रॉस एनपीए’मध्ये ऐतिहासिक घट*
बीड (प्रतिनिधी) : स्थानिक आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्री गजानन नागरी सहकारी बँक लि., बीड यांनी 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत आपली भक्कम प्रगती कायम ठेवली आहे. ठेवी, कर्जवाटप, नफा, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त या सर्वच घटकांमध्ये लक्षणीय वाढ साधत बँकेने ‘उत्कृष्ट’ कामगिरीचा मान पटकावला आहे.बँकेच्या ठेवींमध्ये 23.80 टक्क्यांची वाढ होत त्या 12,755.40 लाखांवरून 15,791.04 लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. ही वाढ ग्राहकांच्या दृढ विश्वासाचे प्रतीक ठरत आहे. त्याचबरोबर कर्जवाटपातही 29.02 टक्क्यांची वाढ होऊन कर्जरक्कम 8,088.05 लाखांवरून 10,434.83 लाखांपर्यंत गेली आहे. यामुळे स्थानिक उद्योग, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजांना चालना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.नफ्याच्या बाबतीतही बँकेने उल्लेखनीय झेप घेतली आहे. ढोबळ नफा 76.46 टक्क्यांनी वाढून 230.70 लाखांवर, करपूर्व नफा 90.92 टक्क्यांनी वाढून 211.42 लाखांवर, तर निव्वळ नफा 83.78 टक्क्यांनी वाढून 203.52 लाखांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी बँकेच्या सक्षम व कार्यक्षम व्यवस्थापनाची साक्ष देणारी ठरत आहे.गुंतवणुकीत 16.97 टक्क्यांची वाढ होऊन ती 5,437.69 लाखांवर पोहोचली असून नेटवर्थमध्ये 15.01 टक्क्यांची वाढ होत ती 2,254.90 लाखांवर गेली आहे. त्यामुळे बँकेचे आर्थिक स्थैर्य अधिक बळकट झाले आहे. एनपीए नियंत्रणातही बँकेने प्रभावी कामगिरी केली आहे. ग्रॉस एनपीए 3.05 टक्क्यांवरून 2.72 टक्क्यांवर आणण्यात यश आले असून नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात आले आहे.भाग भांडवलात 13.89 टक्क्यांची वाढ झाली असून प्रति कर्मचारी व्यवसाय 14.03 टक्क्यांनी वाढून 819.51 लाखांवर पोहोचला आहे. तसेच खेळते भांडवल 21.52 टक्क्यांनी वाढले असून सीडी रेशो 66.08 टक्क्यांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे बँकेवर कोणतेही थकित कर्ज नसल्याने पारदर्शकता आणि शिस्त यांचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.बँकेच्या या उल्लेखनीय यशामागे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे परिश्रम, समर्पण आणि कुशल नियोजन महत्त्वपूर्ण ठरले आहे. बँकेचे सीईओ, सरव्यवस्थापक, कर्जविभाग व कर्जवसुली अधिकारी यांनी अत्यंत काटेकोर धोरणे राबवत कर्जवाटप व वसुली प्रक्रियेत शिस्त राखली. ग्राहकाभिमुख सेवा, वेळेवर निर्णयक्षमता आणि पारदर्शक कामकाज यामुळे बँकेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.कर्जवसुली अधिकाऱ्यांनी प्रभावी पाठपुरावा करून एनपीए नियंत्रणात ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे, तर प्रशासनिक व वित्तीय व्यवस्थापनाने बँकेच्या सर्वांगीण प्रगतीस गती दिली आहे. प्रत्येक कर्मचारीने संस्थेच्या प्रगतीला स्वतःचे ध्येय मानून केलेल्या कार्यामुळेच बँक आज एका यशस्वी टप्प्यावर पोहोचली आहे.बँकेचे अध्यक्ष माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपाध्यक्ष जगदीश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक बीड जिल्ह्यासह मराठवाडा प्रदेशात आर्थिक क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत आहे.एकूणच स्थिरता आणि प्रगती यांचा समतोल साधत श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.,बीड ही ग्राहकांचा विश्वास संपादन करत आर्थिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.आगामी काळातही ही प्रगतीची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील,असा विश्वास व्यक्त होत आहे.


