बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना शिवसंग्रामचा पाठिंबा
पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा
बीड (प्रतिनिधी) : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी व अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, या निवडणुकीत सुनेत्रा अजित पवार या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामने सुनेत्रा अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृतपणे ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यातील ऋणानुबंध हे केवळ राजकीय नव्हते, तर वैचारिक आणि सामाजिक पातळीवरही अतूट होते. त्या नात्याचा मान राखत शिवसंग्रामकडून हा पाठिंबा देण्यात येत आहे.
डॉ. मेटे यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राची परंपरा ही सहानुभूती, बांधिलकी आणि सामाजिक ऐक्याची आहे. एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची संस्कृती महाराष्ट्राने नेहमीच जपली आहे. याच परंपरेचा आदर राखत, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या अजितदादांच्या कुटुंबीयांना साथ देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, प्रचाराला वेग आला आहे. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीला मिळणारा वाढता पाठिंबा आणि सहानुभूतीची लाट यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसंग्रामच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
एकूणच, या पोटनिवडणुकीकडे केवळ राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची कसोटी म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक राज्यभरात विशेष लक्षवेधी ठरत आहे.


