*सर्वसामान्य लोकांची कामे करायचीत असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा- आ.संदीप क्षीरसागर*
- *नगरपालिकेच्या अनुषंगाने आ.क्षीरसागरांनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक*
बीड दि.११ (प्रतिनिधी):- सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठीच आपण निवडणूक लढत आहोत. शहरातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर आपल्याला काम करायचे आहे. निवडून आल्यानंतरही आपल्याला लोकांची कामे करायचे आहेत, असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा. आपल्या पक्षाच्या पुरोगामी विचारधारेनुसार आपल्याला काम करायचे. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले. मंगळवारी (दि.११) रोजी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.
नगरपालिका निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. या निवडणुकीतील रणनीती आखण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.११) रोजी राष्ट्रवादी भवन बीड, येथे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांनी आपापली मते मांडली. दरम्यान हि बैठक केवळ चर्चा करण्यासाठी असतानाही, या बैठकीला अक्षरशः सभेचे स्वरूप आले. या बैठकीत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. जनतेच्या आशा-अपेक्षांचा वेध घेत, विकास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिण्याची तयारी सर्वांना सोबत घेऊन केली आहे असे आ.क्षीरसागर यांनी सांगितले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


