एशिया न्यूज बीड

गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिला बी.ए. कला शाखेतून अमरावती विद्यापीठात प्रथम मेरिट ग्रामीण जगण्याला प्रेरणा देणारी असामान्य कामगिरी

गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिला बी.ए. कला शाखेतून अमरावती विद्यापीठात प्रथम मेरिट  ग्रामीण जगण्याला प्रेरणा देणारी असामान्य कामगिरी

गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिला बी.ए. कला शाखेतून अमरावती विद्यापीठात प्रथम मेरिट

  • ग्रामीण जगण्याला प्रेरणा देणारी असामान्य कामगिरी

खामगाव :- पिंपळगाव राजा (ता. खामगाव) या छोट्याशा ग्रामीण भागातील रहिवासी तसेच गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (कला) शाखेच्या परीक्षेत 9.06 CGPA प्राप्त करून तिने प्रथम मेरिट मिळवली आहे. साध्या परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही उत्कृष्ट यश संपादन करता येते, याचे उत्तम उदाहरण कु. सफिया बेगम सरफराज बेग हिने सर्वांसमोर ठेवले आहे. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, साधं घर आणि कष्टकरी कुटुंब अशा परिस्थितीमध्ये वाढूनही सफियाने प्रामाणिकपणा, नियमित अभ्यास आणि चिकाटी यांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचे प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी स्थानिक गुलशन-ए-हाफिज उर्दू प्राथमिक शाळेत झाले, तर 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव राजा येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत तिने 89.20 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर बारावी परीक्षेत तिने 88.33 टक्के गुणांची कमाई केली. या दोन्ही परीक्षांमधील सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे ती पुढील उच्च शिक्षणातही चमकेल याची पावती तेव्हाच मिळाली होती. उच्च शिक्षणासाठी तिने खामगाव येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रवेश घेतला आणि येथेही तिची मेहनत, नियमितता आणि प्रत्येक विषयाकडे जबाबदारीने पाहण्याची वृत्ती कायम राहिली. तिची शिस्त, अभ्यासावरील निष्ठा आणि विषयांचे उत्कृष्ट आकलन या सर्वांचा परिणाम म्हणून ती संपूर्ण विद्यापीठात पहिल्या क्रमांकावर पोहोचली. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे खामगाव तालुका, महाविद्यालय आणि पिंपळगाव राजा गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिक्षक, ग्रामस्थ, प्राध्यापक आणि मित्रपरिवाराने तिच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आणि अभिमान व्यक्त केला. सफियाची कौटुंबिक पार्श्वभूमी साधी असली तरी शिक्षणाबद्दलचा ठाम विश्वास आणि पालकांच्या संस्कारांनी तिचा आत्मविश्वास अधिक दृढ केला. तिचे वडील सरफराज बेग शकूर बेग यांचे शिक्षण 9वीपर्यंत झाले असून पिंपळगाव राजा येथे ‘गॅलेक्सी स्पेअर पार्ट्स’चे दुकान ते चालवतात. आई सुलताना बेगम यांचे शिक्षण 7वीपर्यंत झाले असून त्या गृहिणी आहेत. साध्या आर्थिक परिस्थिती असूनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सफियाला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सादिया बेगम सध्या दहावीमध्ये शिकत असून पिंपळगाव राजा टॅलेंट सर्च (PTS) परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून तिला टॅब्लेट पारितोषिक मिळाले. तिसरी बहीण सालिहा बेगम 9वीत असून तिने शिष्यवृत्ती परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. भाऊ मुज्जमिल बैग सध्या 2रीत शिक्षण घेत आहे. सफियाच्या यशाबद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब बोबडे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम मेरिट मिळवणे ही अत्यंत प्रशंसनीय बाब असून अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, अभ्यासातील सातत्य आणि विषयांवरील पकड याचे विशेष कौतुक केले. उर्दू विभाग प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी तिच्या शांत, अभ्यासू आणि जिद्दी वृत्तीचा उल्लेख करून उर्दू, इंग्रजी, इंग्रजी साहित्य, इतिहास आणि पर्शियन या विषयांतील तिच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष अजिंक्यदादा बोबडे आणि सौ. श्रद्धाताई बोबडे, मंडळाचे सर्व माननीय सदस्य तसेच प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सफियाचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सफिया बेगमचे संपूर्ण यश पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर ती स्वप्ने पूर्णही करता येतात हे तिने सिद्ध केले आहे. पिंपळगाव राजा ते अमरावती विद्यापीठ असा तिचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे पिंपळगाव राजा गावाचे नाव विद्यापीठात आणि संपूर्ण समाजात अभिमानाने उजळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *