दिल्लीतील थल सैनिक कॅम्पमध्ये गो. से. महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट विश्वजीत इंगळेची सुवर्णझेप
सुवर्णपदकासह प्रतिष्ठेचा ‘कलर कोट’ प्राप्त करून महाराष्ट्राचा गौरव
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील एनसीसी युनिटमधील कॅडेट विश्वजीत हिम्मतराव इंगळे याने दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील थल सैनिक कॅम्प (TSC) मध्ये नेत्रदीपक कामगिरी करत शूटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला प्रतिष्ठेचा ‘कलर कोट’ (Color Coat) प्रदान करण्यात आला असून, या यशामुळे महाविद्यालयासह खामगाव तालुका व महाराष्ट्राचा नावलौकिक वाढला आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या या थल सैनिक कॅम्पमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवड झालेल्या सर्वोत्तम एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदविला होता. या कॅम्पमध्ये कॅडेट्सची शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, ड्रिल, नेतृत्वगुण, शस्त्र हाताळणी तसेच विशेषतः शूटिंग स्पर्धांमधील अचूकता व सातत्य यावर कठोर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व कसोट्यांमध्ये कॅडेट विश्वजीत हिम्मतराव इंगळे याने सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करत शूटिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवले आणि उत्कृष्ट कॅडेट म्हणून ‘कलर कोट’ प्राप्त करण्याचा मान संपादन केला. कॅडेट विश्वजीत इंगळे हा गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील एनसीसी युनिटचा विद्यार्थी असून, त्याने या कॅम्पमध्ये महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि एनसीसी प्रशिक्षणातून मिळालेली शिस्त महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे यांनी कॅडेट विश्वजीत इंगळे याचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा यशामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी परंपरेत मानाचा तुरा रोवला गेल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री प्रकाशजी तांबट व सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे यांनीही कॅडेटचे कौतुक करून अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयाची यशस्वी परंपरा एनसीसी कॅडेट्सनी सातत्याने कायम ठेवली असून, यावर्षीही महाविद्यालयातील कॅडेटने दिल्लीमध्ये महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या कामगिरीसाठी 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला, एओ लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी, सुभेदार मेजर दिनेश कुमार तसेच सुभेदार सचिन बोधे यांनी कॅडेट विश्वजीत इंगळे याचे अभिनंदन करत त्याच्या शिस्तबद्ध व उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश संपादन झाल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांच्या प्रशिक्षणाबद्दलही प्रशंसा व्यक्त करण्यात आली आहे. कॅडेट विश्वजीत इंगळे यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे आई-वडील, महाविद्यालयातील सर्व एनसीसी कॅडेट्स, शिक्षक, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे तरुणांमध्ये एनसीसीकडे ओढ वाढून देशसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


