गो. से. महाविद्यालयात रासेयो तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवाद
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव (प्रतिनिधी) – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत आणि समाजक्रांतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सभागृहात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे दर्शन घडवणारे फलक, चित्रदालन व प्रेरणादायी घोषणा लावण्यात आल्या होत्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव, त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण, महिलांच्या उन्नतीसाठीची त्यांची भूमिका आणि आधुनिक भारताच्या घडणीत त्यांनी बजावलेली भूमिका विस्ताराने स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाला परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. त्यांनी शोषित-वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय लोकशाही अधिक सक्षम झाली आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे पालन करून समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. टी. अढाऊ यांनी केली. त्यांनी रासेयोच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सामाजिक बांधिलकीची माहिती देत विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे संघर्ष, ज्ञान आणि आत्मबळाचा अद्वितीय प्रवास आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांची गाठ धरून पुढे जायला हवे.” कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुभाष वाघ, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. नीता बोचे यांच्यासह सर्व विभागांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. उमेश खंदारे, प्रा. विक्रम मोरे, प्रा. डॉ. महेश गायकवाड, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. बाळासाहेब टकले, प्रा. संगीता वायचाळ, प्रा. टापरे, प्रा. जगताप, प्रा. ढाले, प्रा. मोगल, प्रा. खरात मॅडम, प्रा. कदम मॅडम, प्रा. कोल्हे मॅडम, प्रा. पाटील मॅडम यांनी कार्यक्रमातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय कामात सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुभाषजी बोबडे आणि सचिव आदरणीय प्रशांतजी बोबडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच महाविद्यालयात अशा समाजाभिमुख आणि मूल्याधिष्ठित कार्यक्रमांना सातत्य मिळत असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु. दीक्षा खोडे यांनी केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर आधारित विचारप्रवर्तक ओळींचा उल्लेख करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. आभार प्रदर्शन कु. सोनाली कळसकार यांनी केले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजातील सकारात्मक बदलासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.


