📰 उर्दू शाळांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा
अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेकडून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बीड | प्रतिनिधी
जिल्हा परिषद बीड अंतर्गत विविध संघटनांच्या शाळा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषद बीड येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. डॉ. किरण कुंवर यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना (जि.प.) बीड यांच्या वतीने उर्दू शिक्षणाशी संबंधित स्वतंत्र निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनात उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची स्वतंत्र ज्येष्ठता सूची तयार करण्यात यावी, जेणेकरून पदोन्नती, बदली व इतर सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शकता राहील, अशी ठोस मागणी करण्यात आली.
तसेच उर्दू शाळांमधील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची रिक्त पदे, तसेच गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. ही सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
ऑनलाईन बदली प्रक्रियेदरम्यान काही शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अशा शिक्षकांना कार्य मुक्त करून रुजू होण्यासाठी सुलभता देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय पवित्र रमजान महिना 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने, उर्दू माध्यमाच्या शाळा सकाळी सत्रात भरविण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मा. शाळा, नेकनूर (निजामकालीन) इमारतीसाठी अनुदानाची शिफारस करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
यावेळी बहुजन शिक्षक संघटनेचे नेते मा. विजयकुमार समुद्रे सर यांनीही उर्दू शिक्षणाशी संबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले.
बैठकीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बीड यांनी निवेदन स्वीकारून सर्व मागण्यांवर नियमांनुसार सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम. सय्यद अंजुम, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद आणि कार्याध्यक्ष उस्मान खान यांची प्रमुख उपस्थिती होती.


