*राज्य कर्मचारी व शिक्षकांचा बेमुदत संपाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा ठाम पाठिंबा*
बीड — विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती (जिल्हा बीड) यांच्या वतीने मंगळवार, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे हे आंदोलन सुरू झाले असून, प्रशासनावर त्याचा तात्काळ परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
या संपाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव श्री. कादरी शाहेद यांनी जाहीर आणि ठाम पाठिंबा दर्शवला आहे. “कर्मचारी आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात,” अशी भूमिका संघटनेचे संस्थापक सचिव कादरी श्शहेद सर यांनी स्पष्ट केली.
संपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर अधिसूचना तात्काळ जारी करण्याची मागणी अग्रस्थानी आहे. त्याचबरोबर इतर १७ महत्वाच्या मागण्यांकडेही शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी डॉ. शशिकांत गायकवाड, असरार खाम, राज्कुमार कदम सर, तांदळे सर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विभागांतील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.


