*दहावी व बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे सुरू*
बीड (प्रतिनिधी) : दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात योग्य दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील समस्या दूर व्हाव्यात या उद्देशाने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.
या प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती, प्राधान्यक्रमानुसार कॉलेज व शाखा निवड, कागदपत्र पडताळणी तसेच प्रवेशाशी संबंधित सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शनही येथे केले जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ व गैरसोय टाळली जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, क्षमता व भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडीसाठी योग्य सल्ला दिला जाईन.
प्राचार्य डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ ट्रेंड पाहून नव्हे तर आपल्या कौशल्यांनुसार शाखा निवडणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी भविष्यात सक्षम तंत्रज्ञ म्हणून घडू शकतात. या प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊन विद्यार्थी आपला करिअर मार्ग अधिक सुकर करू शकतात.”
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये पाहता, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन हे तांत्रिक शिक्षणात अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक मानले जाते. येथे अद्ययावत प्रयोगशाळा, अनुभवी व पात्र प्राध्यापकवर्ग, डिजिटल क्लासरूम्स, ई-लर्निंग सुविधा, समृद्ध ग्रंथालय तसेच उद्योगसंलग्न प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आणि प्लेसमेंट मार्गदर्शन यावरही विशेष भर दिला जातो.तसेच, महाविद्यालयामध्ये ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC)’ कार्यरत असून नवोपक्रम, उद्योजकता आणि संशोधनवृत्तीला चालना दिली जाते. सुरक्षित आणि आधुनिक कॅम्पस, फायर सेफ्टीसारख्या अत्याधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण ही या महाविद्यालयाची आणखी वैशिष्ट्ये आहेत. महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागही कार्यरत असून त्यामार्फत हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच शासकीय व खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्रात अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्व शंका निरसनासाठी उपलब्ध राहणार असून इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


