आमदार संग्राम जगताप यांच्या ‘त्या’ जातीयवादी विधानाचा तीव्र निषेध; राष्ट्रवादीने आपल्या आमदाराला लगाम घालावा!
अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी काल ‘बुरखा हटाव, देश बचाव’ असा जो अत्यंत निंदनीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रपोगंडा सुरू केला आहे, त्याचा मी अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करतो. राज्याला भेडसावणारे बेरोजगारी आणि महागाई यांसारखे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून, केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी आणि राजकीय पोळ्या भाजण्यासाठी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचे हे कृत्य अतिशय नीच पातळीवरचे आहे. देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीनुसार आणि परंपरेनुसार जगण्याचा अधिकार दिला आहे, त्यावर घाला घालण्याचा अधिकार या आमदारांना कोणी दिला?
सत्तेच्या मस्तीत बेताल बडबड करणाऱ्या आमदार जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळीच आवरायला हवे. माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वाकडे जाहीर मागणी आहे की, त्यांनी या प्रवृत्तीला तातडीने लगाम घालावा. जर या द्वेषपूर्ण आणि बेजबाबदार विधानावर पक्षाने मौन बाळगले, तर हा संपूर्ण विषारी प्रचार पक्षाच्या मूकसंमतीनेच सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येईल.
समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आमदार जगताप यांनी आपले शब्द त्वरित मागे घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा, या द्वेषपूर्ण राजकारणाविरोधात लोकशाही मार्गाने जशास तसे उत्तर दिले जाईल आणि याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
— मुशर्रफ सलीम शेख
(राज्य सचिव, एनएसयूआय)


