एशिया न्यूज बीड

लोकसेवेचा अखंड दीप : स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे

लोकसेवेचा अखंड दीप : स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे

स्व. पूज्य, आदरणीय भाऊसाहेब बोबडे यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष स्मरण

श्रीमती निताताई बोबडे

(अध्यक्षा, निसर्ग संस्था, खामगाव)

आज माझे सासरे, पूज्य व आदरणीय स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते.
आजही त्यांच्या निर्वाणाचा दिवस आठवतो. ८ जुलै २००७ रोजी शेकडो लोक आमच्या घरासमोर जमले होते. भाऊंना शेवटचा निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. आकाशातूनही अगदी फवारे उडावेत तसे बारीक पावसाचे थेंब पडत होते. जणू या महान आत्म्याला अखेरचा निरोप देताना आभाळालाही अश्रू अनावर झाले होते.
एखादी व्यक्ती एखाद्या एका क्षेत्रात आदर्श असते किंवा दोन-तीन क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करते. पण माझ्या पाहण्यात आलेल्या सर्व व्यक्तींमध्ये भाऊसाहेब हे एकमेव असे होते की, त्यांनी जीवनातील केवळ एक-दोन नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिणाम त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकावर झाला. भाऊंबद्दल लिहिण्याइतकी मी मोठी मुळीच नाही. मी केवळ त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्यांचे कार्य इतके अफाट आहे की, त्याचे वर्णन करणे शब्दांच्या पलीकडचे आहे.
निसर्ग, वृक्ष आणि पर्यावरण यांच्याबद्दल त्यांना विलक्षण प्रेम होते. खामगावातील जनुना तलाव, नटराज गार्डन आणि टॉवर गार्डन येथे त्यांनी अनेक प्रकारची वृक्षलागवड केली. आमच्या घराच्या समोर आणि मागे विविध जातींचे गुलाब होते. मागील अंगणात आंब्याचे झाड, पुढील अंगणात गोड चिकू, बाजूला नारळाचे झाड आणि पूर्वेकडील छोट्याशा जागेत अद्रक, हळद, लसूण, कांदे, फ्लॉवर, पानकोबी, पालक, मुळा, मेथी, शेवगा अशा विविध भाज्यांची लागवड होती. वेलींवर वाल, चवळी, तोंडली, गवार अशा अनेक भाज्या येत असत. त्यामुळे बाजारातून भाजीपाला क्वचितच आणावा लागत असे.
वृक्षांबद्दल त्यांना इतके आकर्षण होते की, त्यांनी युरोप आणि अमेरिकेतूनही विविध प्रकारची रोपे आणून खामगावात लावली. मी स्वतः पाहिलेल्या झाडांपैकी एक झाड आजही चांदमारी येथील विकमसी चौकात उभे आहे. पावसाळ्यात त्या झाडाला लालभडक, मखमलीसारखी मोठी फुले येतात. त्यानंतर त्याला अतिशय मोठी, कवठासारख्या रंगाची आणि आकाराने मोठ्या चिंचेसारखी फळे लागतात.
यासंदर्भातील एक घटना आजही माझ्या मनात कोरली गेली आहे. भाऊसाहेबांच्या निधनानंतर अवघ्या आठ दिवसांनी त्यांनी नगरपालिकेत लावलेले एक प्रचंड मोठे विदेशी झाड अचानक कोसळले. योगायोगाने त्या दिवशी मी त्या रस्त्याने दवाखान्यात जात होते. पाऊस नव्हता, वादळ नव्हते, वारा नव्हता; तरीही चार-पाच मीटर घेराचे ते विशाल झाड शांतपणे उन्मळून पडले होते. झाड हिरवेगार होते, त्यावर सुंदर फुलेही उमलली होती. ते सुकलेलेही नव्हते. मला याचे खूप आश्चर्य वाटले. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, “हे झाड भाऊंनी लावले होते.” त्या क्षणी माझ्या मनात विचार आला—झाडेही जिवंत असतात, त्यांनाही भावना असतात, हे विधान जणू या घटनेने खरे ठरवले. भाऊसाहेब आता आपल्यात नाहीत, हे जणू त्या झाडालाही कळले आणि त्यानेही आपले प्राण सोडले. त्या क्षणी मी मनोमन त्या झाडालाही आणि भाऊंच्या महानतेलाही हात जोडले.
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाऊसाहेबांनी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रीय शाळेचे पंधे गुरुजी हे त्यापैकीच एक होते. त्यांनी तयार केलेल्या सुंदर मूर्तीचे अवशेष आजही जनुना तलावाजवळ पाहायला मिळतात. तसेच गारडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य धातूचा पुतळाही भाऊसाहेबांच्या कल्पनेतूनच साकार झाला.
खामगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. मेहतर समाजातील लोकांच्या निवासासाठी त्यांनी संपूर्ण टेकडीच उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या वस्तीला लोकांनी “शंकर नगर” हे नाव दिले.
जी. एस. कॉलेजची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या शेजारी पॉलीटेक्निक आणि आय.टी.आय. महाविद्यालयासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीची आणि लोककल्याणाच्या भावनेची ही सर्वोच्च उदाहरणे आहेत. जेव्हापासून ते कॉलेजचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून ते वयाच्या ९४व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी कॉलेजच्या कागदपत्रांवर स्वतः स्वाक्षऱ्या केल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते की, मला त्यांचा सहवास आणि आशीर्वाद लाभला.
भाऊसाहेबांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, शांत, समंजस आणि प्रेमळ होता. एखाद्या मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून येणे ही साधी गोष्ट नाही. निवडून आल्यानंतर त्यांनी जे लोककल्याणाचे कार्य केले, त्याची पुण्याई केवळ आम्हालाच नव्हे तर पुढील अनेक पिढ्यांनाही लाभेल, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.
सन २००३ मध्ये मी माझ्या कलाकृतींचे प्रदर्शन काँग्रेस भवन येथे भरविले होते. हे प्रदर्शन दोन दिवसांचे होते. वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आणि आणखी दोन दिवस प्रदर्शन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. या प्रदर्शनाला भाऊसाहेब आले. त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, “छान केलेस हे. आता याचा उपयोग महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कर.” भाऊंची ही इच्छा मी शिरसावंद्य मानली आणि आजही शक्य तितक्या महिलांना रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहे. कोटी कोटी प्रणाम, भाऊसाहेब!
माझ्या सासूबाई, स्व. पूजनीय इंदूमती बोबडे या डॉक्टर होत्या. भाऊसाहेब आणि सासूबाईंनी मिळून आपल्या आठ अपत्यांना—सहा मुलगे आणि दोन मुली—उत्तम संस्कार, उच्च शिक्षण आणि आदर्श मूल्ये देऊन घडविले. सर्व मुलांची लग्ने करून, नातवंडांना आशीर्वाद देऊन त्यांनी अत्यंत समाधानाने आणि जीवनाचे सार्थक करून या जगाचा निरोप घेतला.
आमच्या सर्वात मोठ्या सुनबाईंनी एकदा भाऊसाहेबांना (म्हणजे आजेसासऱ्यांना) विचारले, “आयुष्य कसे जगावे?” मीही तेथेच उपस्थित होते. त्यावर भाऊसाहेबांनी अत्यंत मोलाचे उत्तर दिले— “प्रत्येक दिवस महत्त्वाचा समजून आनंदाने जगावे. दुसऱ्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या भल्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करावे. शेवटी समाधानाने आणि आनंदाने या जगाचा निरोप घ्यावा.” हे शब्द माझ्या काळजावर कायमचे कोरले गेले. माणसातील देवत्व यापेक्षा वेगळे काय असू शकते?
जाता जाता एक गंमतीशीर गोष्ट सांगावीशी वाटते. कोणत्या घरात मुले आपल्या वडिलांना “भाऊ” आणि आईला “वहिनी” म्हणत असतील? कोणत्या घरात सुना आपल्या सासऱ्यांना “भाऊ” आणि सासूबाईंना “वहिनी” म्हणत असतील? आणि एवढेच नव्हे, तर नातवंडेसुद्धा त्यांनाच “भाऊ” आणि “वहिनी” म्हणत असत! हे कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर सन्मान यांचे अनोखे उदाहरण होते.
आदरणीय भाऊसाहेबांबद्दल जे काही लिहिले जाऊ शकते, तो एक अथांग समुद्र आहे आणि हा लेख त्या समुद्रातील केवळ एक थेंब आहे. “होतील बहु झालेत बहु परी यासम हे!” भाऊसाहेब आमच्यासाठी सदैव प्रेरणास्थान, आदर्श आणि पूजनीय राहतील.
कोटी कोटी प्रणाम, भाऊसाहेब!

contributor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *