अकोला, दि. ९ : देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते १२ मराठा लाईट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते. जम्मू–काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये सेवा बजावत असताना त्यांचे बलिदान झाले.शहिद नायक वैभव लहाने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फंट्रीचे सीएचएम रामेश्वर पाटील तसेच लहाने कुटुंबीयांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सैनिकी विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तर पोलीस विभागातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून वीर वैभव लहाने यांना अखेरचा निरोप दिला.‘भारत माता की जय’, ‘शहिद जवान वैभव लहाने अमर रहे’ अशा घोषणा देत नागरिकांनी वीर शहिदास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.