प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; ‘करिअर कट्टा’ अंतर्गत जी. एस. कॉलेज, खामगाव गौरवित
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय महत्त्वाकांक्षी ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी जी. एस. कॉलेज, खामगाव यांची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाला ए+ श्रेणी प्राप्त झाली असून, ही कामगिरी संपूर्ण खामगाव शहरासह बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. या यशाबद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब बोबडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जी. एस. कॉलेज, खामगावला ‘करिअर कट्टा’ अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्सचा मान व ए+ श्रेणी मिळणे, ही केवळ महाविद्यालयाचीच नव्हे तर संपूर्ण विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पावती आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणामुळे हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील. संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत बोबडे यांनीही समाधान व्यक्त करताना नमूद केले की, महाविद्यालयाला ए+ श्रेणी प्राप्त होणे ही सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध कार्य आणि टीमवर्कची फलश्रुती आहे. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळेच हे मानांकन मिळाले आहे. ‘करिअर कट्टा’ सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण व कौशल्यविकासाच्या व्यापक संधी उपलब्ध होत असून, त्यातून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल, याचा आम्हाला विश्वास आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब बोबडे, सचिव डॉ. प्रशांत बोबडे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राज्यातील निवडक महाविद्यालयांनाच मिळणारा हा सन्मान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उच्च शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्यविकास उपक्रम, करिअर मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण, तसेच रोजगाराभिमुख कार्यक्रमांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे प्रदान करण्यात आला आहे. ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उद्योजकता विकास, आयटी व डिजिटल कौशल्य प्रशिक्षण, तसेच करिअर समुपदेशनाच्या प्रभावी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या यशामागे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, डॉ. व्ही. एस. अठवार, समन्वयक प्रा. अक्षय सिडाम, तसेच सर्व प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांचे सामूहिक व सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. गुणवत्ताधिष्ठित अध्यापन, नवोन्मेषी उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित धोरणांमुळे महाविद्यालयाने हा मानांकनाचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे. या मानांकनामुळे जी. एस. कॉलेज, खामगाव हे विदर्भातील एक आदर्श करिअर मार्गदर्शन व कौशल्यविकास केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.