खामगाव : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर (बारामती) यांच्या सहकार्याने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय पाच दिवसीय ‘करिअर संसद’ अधिवेशन दिनांक ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत बारामती येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय अधिवेशनात गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील ९ विद्यार्थी व २ प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग नोंदविला. अधिवेशनादरम्यान विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञ, मार्गदर्शक व अनुभवी व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. करिअर मार्गदर्शन, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगाराच्या नवीन दिशा तसेच आधुनिक काळातील करिअर पर्यायांविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या ‘करिअर संसद’ अधिवेशनाचा मुख्य उद्देश युवकांचा सर्वांगीण विकास, करिअर नियोजन, उद्योजकतेला चालना, आर्थिक साक्षरता, तसेच आधुनिक व उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणे हा होता. विविध सत्रांमधून विद्यार्थ्यांना करिअरविषयी स्पष्ट दिशा, आत्मविश्वास व निर्णयक्षमता विकसित करण्यास मदत झाली. संवादात्मक सत्रे, मार्गदर्शनपर व्याख्याने व चर्चांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी लाभली. या राज्यस्तरीय अधिवेशनातील सहभागासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांचे मार्गदर्शन तसेच कॉलेज ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा. अक्षय सिडाम यांचे विशेष परिश्रम लाभले. त्यांच्या प्रेरणा, नियोजन व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व्यासपीठावर सहभागी होण्याची मौल्यवान संधी प्राप्त झाली. गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगावचा ‘करिअर संसद’ अधिवेशनातील हा सक्रीय सहभाग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक तयारी वाढीस लागल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.