बारामती : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत दिनांक ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय Faculty Development Program (FDP) चे अत्यंत यशस्वी आयोजन बारामती येथे करण्यात आले. हा कार्यक्रम गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव, शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर (बारामती) तसेच महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी, पुणे यांच्या सहकार्याने संयुक्त पद्धतीने राबविण्यात आला. या मंचावर राज्यभरातून एकूण ११२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे विविध विषयांतील अनुभव व कौशल्यांचे प्रभावी आदान–प्रदान होण्याची संधी उपलब्ध झाली. या FDP चा मुख्य उद्देश शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन पद्धती, डिजिटल कंटेंट निर्मिती, विद्यार्थी मूल्यमापन तसेच आधुनिक शिक्षणतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिक्षकांपर्यंत पोहोचवणे हा होता. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांच्या अध्यापन क्षमतेत सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक पद्धतीने शिक्षण देता यावे, हा प्रमुख हेतू होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. मिथिला दलवी यांनी “AI च्या युगातील भावनिक बुद्धिमत्ता” या विषयावर सखोल मार्गदर्शन करत तंत्रज्ञानाच्या वापरासोबत मानवी मूल्ये, सहानुभूती आणि विद्यार्थ्यांशी भावनिक नाते जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अथर्व वेंगुर्लेकर यांनी AI Fundamentals आणि Content Creation या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले, ज्यामुळे सहभागी शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये आत्मविश्वास प्राप्त झाला. याशिवाय डिंपल मित्तल यांनी वित्तीय साक्षरता बाबत मार्गदर्शन करून शिक्षकांसाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. या प्रशिक्षणामध्ये ChatGPT वापरून पाठ्यक्रम योजना (Lesson Planning), प्रश्नपत्रिका निर्मिती, Notes व PowerPoint तयार करणे, विद्यार्थी कामगिरी विश्लेषण तसेच AI चा जबाबदार व नैतिक वापर यासारख्या आधुनिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे सहभागी प्राध्यापकांना आधुनिक शिक्षण पद्धतींबाबत नवे कौशल्य व आत्मविश्वास प्राप्त झाला असून, ते हे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे वापरणार असल्याचे आयोजकांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या Faculty Development Program मुळे शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रमांना चालना मिळाली असून, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील शिक्षकांना आधुनिक अध्यापन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यावेळी गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगावचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत आयोजित हा राज्यस्तरीय Faculty Development Program शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज ओळखणारा आहे. AI, डिजिटल शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि नैतिक मूल्यांची सांगड घालणारे हे प्रशिक्षण शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरेल. या कार्यक्रमातून मिळालेले ज्ञान प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे वापरतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.” या राज्यस्तरीय FDP मुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानस्नेही, नवोन्मेषी व गुणवत्ताधिष्ठित अध्यापनाला चालना मिळणार असून, ‘करिअर कट्टा’ उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.