स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास व सुरक्षितता वाढते- मा. अजिंक्य बोबडे
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समितीच्या वतीने ३ ते १२ जानेवारी या कालावधीत “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समिती व इनर व्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून, आज या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. व्ही. पडघन हे होते, तर उद्घाटक म्हणून मा. श्री. अजिंक्यजी बोबडे (कोषाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी उपस्थिती दर्शवली. प्रमुख अतिथी म्हणून स्वाती अग्रवाल (अध्यक्षा, इनर व्हील क्लब) तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून साक्षी गोयंका (कोषाध्यक्ष, इनर व्हील क्लब) या उपस्थित होत्या. याशिवाय स्वर्गीय शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर यांच्या मुख्याध्यापिका खांडे मॅडम यांनीही व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. व्यासपीठावर महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. मारवाडी मॅडम तसेच स्वसंरक्षण समितीच्या समन्वयक प्रा. पूनम तिवारी या देखील उपस्थित होत्या. उद्घाटक मा. श्री अजिंक्यजी बोबडे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वसंरक्षण ही केवळ शारीरिक क्षमता नसून आत्मविश्वास, सजगता आणि प्रसंगावधान यांची सांगड आहे. अशा प्रशिक्षणातून विद्यार्थिनींमध्ये आत्मभान निर्माण होऊन त्या कोणत्याही परिस्थितीत निर्भीडपणे उभ्या राहू शकतात, असे त्यांनी नमूद केले. प्रशिक्षण वर्गासाठी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. ए. व्ही. पडघन म्हणाले की, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक व शारीरिकदृष्ट्याही सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधान विकसित होते. अशा प्रकारचे उपक्रम महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतात. महाविद्यालयाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ विद्यार्थिनींनी घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मारवाडी मॅडम यांनी केले. संचालन प्रा. वृषाली घोराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम तिवारी यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वर्गीय शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर येथील सर्व शिक्षक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वसंरक्षण समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रा. योगेश म्हैसागर, प्रा. राजकुमार फाटे, प्रा. वर्षा कोकाटे, प्रा. वृषाली घोराळे, प्रा. डॉ. दिपाली धरमकार, प्रा. प्रदीप बानाईत, प्रा. नैना मिश्रा, प्रा. खंडारे आदींचा समावेश होता.