खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ सप्ताहाअंतर्गत महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी ‘युवांसाठी उद्योगाच्या नवनवीन संधी’ या विषयावर मार्गदर्शनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य व वनस्पति शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही. पडघन हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीमती नीता ताई बोबडे, अध्यक्षा, निसर्ग संस्था, खामगाव यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर प्रमुख व्याख्याते म्हणून श्री गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी., जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांनी उपस्थितांना उद्योग क्षेत्रातील विविध संधींबाबत सखोल व मार्गदर्शनपर माहिती दिली.प्रमुख व्याख्याते श्री गणेश गुप्ता यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सध्याच्या औद्योगिक वातावरणाची ओळख करून देत उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. शासकीय योजनांचा लाभ, उद्योग नोंदणी प्रक्रिया, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण सुविधा तसेच युवकांसाठी उपलब्ध स्वयंरोजगाराच्या विविध संधी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. योग्य नियोजन, चिकाटी व कौशल्यविकासाच्या माध्यमातून युवक यशस्वी उद्योजक होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रमुख अतिथी श्रीमती नीता ताई बोबडे यांनी आपल्या मार्गदर्शनात “टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू” तसेच हेल्दी फूड उत्पादने यांसारख्या पर्यावरणपूरक उद्योगांच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांनी व युवांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून अशा उद्योगांकडे वळावे, ज्यातून आर्थिक स्वावलंबनासोबत सामाजिक जाणीवही निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून कमी भांडवलात उद्योग सुरू करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी अन्नपदार्थांना मोठी मागणी असून युवक व महिलांसाठी हा उद्योगाचा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण शक्य असून महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत उद्योजकतेच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. ए. व्ही. पडघन यांनी आपल्या प्रभावी व मनोरंजक शैलीत विद्यार्थ्यांना उद्योग व उद्योजकतेविषयी प्रेरणादायी उद्बोधन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योगाकडे वळावे, नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगातून रोजगारनिर्मिती होऊन सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोहिणी धरमकार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तृप्ती नेमाने यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अंजू पालीवाल यांनी केले. महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक म्हणून डॉ. रेश्मा मारवाडी यांनी कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. अर्चना पाटील, प्रा. कैलाश वैराळे, प्रा. मयुरी उमक, प्रा. संतोष वारणकर तसेच श्री लक्ष्मण पालवे, श्री अभय मोहिते व श्री विट्ठल चंदनकार यांनी विशेष परिश्रम घेतले. या मार्गदर्शनात्मक व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून युवकांना उद्योग क्षेत्रातील नवनवीन संधींची प्रभावी ओळख मिळाल्याचे दिसून आले.