डॉ. ज्योती मेटे यांनी घेतल्या जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार

बीड (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम प्रणित लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साक्षाळ पिंपरी ता. जि. बीड येथील श्री. नगद नारायण जिनिंग येथे पार पडली. या बैठकीत शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या बैठकीस शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नारायणराव काशीद, मराठवाडा अध्यक्ष अनिल घुमरे, सुहास पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास नाईकवाडे, सचिन कोटूळे, खरेदी विक्री संघाचे संचालक गोपीनाथ घुमरे, मजूर सहकारी संस्थेचे संचालक बाळासाहेब हावळे, सुनील शिंदे,सुनील कुटे, मनिषा कुपकर, पंडित माने, ज्ञानेश पानसंबळ, माऊली शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिरूर, गेवराई व बीड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा सामाजिक सहभाग, संघटनात्मक कामगिरी, स्थानिक प्रश्नांची जाण, जनतेशी असलेला संपर्क तसेच पक्षविचाराशी असलेली निष्ठा या बाबींचा सखोल आढावा डॉ. ज्योती मेटे यांनी मुलाखतीदरम्यान घेतला.
बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, बूथस्तरीय संघटन मजबूत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न, शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकहिताचे प्रश्न प्राधान्याने मांडणारे, जनतेशी थेट संवाद साधणारे व संघटनेशी प्रामाणिक राहणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.
*“संघटन मजबूत करूया, परिवर्तन घडवूया” हा नारा देत शिवसंग्रामच्या माध्यमातून सक्षम, अभ्यासू व जनतेसाठी लढणारे नेतृत्व उभे करण्याचा निर्धार डॉ. ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केला. लोकनेते विनायकराव मेटे यांच्या विचारांना पुढे नेत विकासाभिमुख राजकारणातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.*


