एशिया न्यूज बीड

*अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट, ‘स्वाराती’मधील अत्याधुनिक नवीन सीटी स्कॅन मशिन आठवडाभरात सुरु होणार* *आ. नमिताताई मुंदडांचा पाठपुरावा यशस्वी; गोरगरीब रुग्णांची परवड थांबणार*

*अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट, ‘स्वाराती’मधील अत्याधुनिक नवीन सीटी स्कॅन मशिन आठवडाभरात सुरु होणार*  *आ. नमिताताई मुंदडांचा पाठपुरावा यशस्वी; गोरगरीब रुग्णांची परवड थांबणार*

*अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट, ‘स्वाराती’मधील अत्याधुनिक नवीन सीटी स्कॅन मशिन आठवडाभरात सुरु होणार*

*आ. नमिताताई मुंदडांचा पाठपुरावा यशस्वी; गोरगरीब रुग्णांची परवड थांबणार*

अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिनचे इन्स्टॉलेशन अखेर पूर्ण झाले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी १ जानेवारी रोजी या मशिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीतून ही अत्याधुनिक मशिन बसवण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून ही मशिन रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी दिली आहे. या सुविधेमुळे बीड जिल्ह्यासह लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे मराठवाड्यातील एक अत्यंत जुने आणि महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र असून येथे दररोज सुमारे २५०० रुग्णांची वर्दळ असते. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा आधार आहे. वैद्यकीय निदानामध्ये सीटी स्कॅन ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण किंवा गंभीर आजारांच्या निदानासाठी ही सेवा जीवनदायी ठरते. मात्र, गेल्या काही काळापासून येथील जुनी मशिन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. रुग्णांची होणारी ही फरफट थांबवण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन राज्य सरकारने सीटी स्कॅन मशिन, इन्स्टॉलेशन, विद्युत काम आणि विशेष बांधकाम यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून कॅनन कंपनीची २५६ स्लाईस क्षमता असलेली अत्यंत अत्याधुनिक मशिन रुग्णालयात दाखल झाली. या मशिनमुळे अत्यंत सूक्ष्म तपशिलांसह (डिटेल रिपोर्ट) आणि अधिक स्पष्टतेसह अहवाल मिळणार असून, यामुळे डॉक्टरांना आजाराचे अचूक निदान करणे सोपे होणार आहे.

या मशिनसाठी रुग्णालयात स्वतंत्र १२ हजार स्क्वेअर फूट जागेत विशेष बांधकाम करण्यात आले असून हा संपूर्ण विभाग वातानुकूलित करण्यात आला आहे. नवीन मशिन सुरू होण्यास तांत्रिक विलंब होत असताना आ. मुंदडा यांनी पुन्हा प्रशासकीय पातळीवर हालचाली केल्या, परिणामी हे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले. मात्र आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या नवीन मशिनची यशस्वी चाचणी झाल्याने गोरगरीब रुग्णांना ही सेवा शासकीय दरात उपलब्ध होणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. या मशिनमुळे केवळ अंबाजोगाईच नव्हे तर शेजारील तीन ते चार जिल्ह्यांतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. अपघातातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ही यंत्रणा मैलाचा दगड ठरेल असे मानले जात आहे.

“नवीन मशीन कार्यान्वित होईपर्यंत अक्षरशः यवतमाळ व अकोला येथील जुन्या मशिनचे पार्ट आणून जुन्या मशीनला लावून तात्पुरती सोय करावी लागली होती. मात्र आता नवीन अत्याधुनिक मशीन सुरु झाल्याने अचून निदान होण्यास मदत होईल. गोरगरीब रुग्णांची परवड थांबणार असल्याचे समाधान आहे.”

-आ. नमिताताई मुंदडा

“नवीन मशिनच्या इन्स्टॉलेशनचे काम आता पूर्ण झाले असून प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून पुढील ५-६ दिवसांत नियमित रुग्ण तपासण्या सुरू केल्या जातील.”

-डॉ. शंकर धपाटे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *