अकोला : अकोला जिल्ह्यात खळबळ उडवणारी आणि राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी गंभीर घटना समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर अत्यंत गंभीर व खोल जखमा झाल्या असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिदायत पटेल हे आज माहोळ गावात असताना काही हल्लेखोरांनी अचानक त्यांना घेरले. क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी पटेल यांच्यावर सपासप वार केले. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर काही काळासाठी गावात पळापळ पाहायला मिळाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिदायत पटेल यांना स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मदतीने तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना तातडीने अकोला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांचे पथक त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रुग्णालयपरिसराततणाव, पोलिसांचाकडकबंदोबस्त हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अकोला व अकोट परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अकोला शहर, रुग्णालय परिसर तसेच माहोळ गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींच्याशोधासाठीविशेषपथके या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास युद्धपातळीवर सुरू आहे. “हा हल्ला कोणी केला आणि त्यामागचा नेमका हेतू काय आहे, याचा सखोल तपास केला जात असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल,” असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राजकीयवैमनस्याचीशक्यता राज्यात सध्या महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापलेले असतानाच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. अकोट नगरपालिकेच्या निवडणुकांच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले होते. त्या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हिदायतपटेलयांचीराजकीयवाटचाल हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असून अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक प्रभावी, आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे अकोला जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळाले होते.या गंभीर घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून, सर्वांचे लक्ष आता हिदायत पटेल यांच्या प्रकृतीकडे तसेच पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.