पत्रकारितेतील निर्भीड आवाजाचा सन्मान: ‘बीड न्यूज आप तक’चे संपादक शेख इमरोज शरीफ यांना ‘सावित्रीबाई फुले लोकरत्न पुरस्कार’ प्रदान
पोलिस हक्क संघर्ष संघटना व शाह अल्पसंख्याक संस्थेकडून गौरव; सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सन्मान
बीड (विशेष प्रतिनिधी):
येथील शाह अल्पसंख्याक बहु-उद्देशीय सेवाभावी संस्था आणि पोलीस हक्क संघर्ष संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरातील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात, डिजिटल मीडिया क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या ‘बीड न्यूज आप तक’चे मुख्य संपादक श्री. शेख इमरोज शरीफ यांना प्रतिष्ठित ‘सावित्रीबाई फुले लोकरत्न पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. बीड जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न, गोरगरीब जनतेच्या समस्या आणि प्रशासकीय अनास्था यांना वाचा फोडण्याचे काम शेख इमरोज शरीफ यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या याच निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. शेख इमरोज शरीफ म्हणाले की, “हा पुरस्कार म्हणजे माझ्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. पत्रकारिता करताना केवळ बातम्या देणे हे उद्दिष्ट नसून, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. हा सन्मान ‘बीड न्यूज आप तक’च्या संपूर्ण टीमचा आणि आमच्या दर्शकांचा आहे.”
सदर पुरस्कार सोहळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुजाहिद मोमीन सर (अतिरिक्त शाल्यचिकित्सक, एडवोकेट झेबा मॅडम , डॉ. सुप्रिया विनेराव लोणे (प्रा. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज, जालना), मा.श्री. कुलदीप वाकपंजार (जिल्हा आयुष्य अधिकारी जालना), डॉ. शेख शकिल जलाल (एक्स मेडिकल ऑफिसर .ए.एम.सी. औरंगाबाद), मा. शेख अब्दुल कदिर (शहा अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सचिव)
उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन शेख इमरोज शरीफ यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून शेख इमरोज शरीफ यांचे कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच या कार्यक्रमाला डॉ. टी आर काझी, डॉ. पठाण इमरान, डॉ. सय्यद इमरान, डॉ. अबूल फैज खान, डॉ. सय्यद रईस, डॉ. हारिस, डॉ. रईसोद्दीन शेख, आदींनी यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


