“शिक्षण आणि आत्मविश्वासाच्या बळावरच स्त्री–पुरुष समानता प्रत्यक्षात साकार होऊ शकते,” डॉ. गीताली पुंडकर
“स्त्री–पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीतूनच साकार होईल” – सौ. श्रद्धाताई बोबडे
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह (दि. ३ ते १२ जानेवारी २०२६) चा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या विशेष सप्ताहाचे उद्घाटन मा. डॉ. गीताली पुंडकर (प्राचार्या, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), डॉ. कांचनताई थोरात (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मलकापूर) तसेच नयन काळमेघ (गृहअर्थशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक पडघन होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रेश्मा मारवाडी यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक जागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या प्रेरणादायी दिनांचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम, शिवणकला व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन व्याख्यान, पथनाट्य, जी. एस. पतंगोत्सव तसेच विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. उद्घाटक डॉ. गीताली पुंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितले की, स्त्री–पुरुष समानता ही केवळ संकल्पना नसून ती प्रत्यक्ष कृतीतून समाजात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना शिक्षण, संधी व सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या कुटुंब, संस्था आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावी योगदान देऊ शकतात. विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, तर विद्यार्थ्यांनीही समानतेचा दृष्टिकोन अंगीकारून महिलांच्या प्रगतीला साथ द्यावी, असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक पडघन यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा, असे मार्गदर्शन केले. हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूनम तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल काळे यांनी केले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सौ. श्रद्धाताई बोबडे यांचे लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संगीता वायचाळ, डॉ. नीता बोचे, डॉ. रोहिणी धरमकर, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते, श्री. विठ्ठल चंदनकर, श्री. लक्ष्मण पालवे, श्री. अरविंद लांडे, सौ. स्वाती खोडके, शारदा इंगळे, अंजली करंगळे, पूजा बोचरे, ऋतुजा वानखडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच दीक्षा खोडे या विद्यार्थिनीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.