खामगाव:- आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, मानसिक व शारीरिक शोषण याविरोधात समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावर “जागर स्त्रीशक्तीचा” या प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण केले. हे पथनाट्य खामगाव शहरातील फरशी सरकारी दवाखाना व बस स्थानक परिसरात सादर करण्यात आले.या पथनाट्याच्या माध्यमातून स्त्री ही केवळ सहनशील नसून सक्षम, आत्मनिर्भर व निर्भय आहे, हा ठाम संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. स्त्रीवर होणारा मानसिक छळ, लैंगिक अत्याचार, सामाजिक अन्याय, कौटुंबिक दबाव अशा गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकत स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. अन्यायाविरोधात आवाज उठविणे ही काळाची गरज असून स्त्रीने निर्भयपणे पुढे येऊन स्वतःच्या हक्कांसाठी लढावे, हा विचार पथनाट्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. या पथनाट्याची संकल्पना व मार्गदर्शन विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळच्या संचालिका मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‘जागर स्त्रीशक्तीचा’ या पथनाट्याच्या माध्यमातून स्त्री ही केवळ सहनशील नसून सक्षम व आत्मनिर्भर आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जागृती निर्माण होऊन समाजपरिवर्तनाची चळवळ उभी राहावी, हीच अपेक्षा आहे.” त्यांच्या मार्गदर्शनामुळे पथनाट्याला सामाजिक वास्तवाची ठोस जोड मिळाली असून प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम साधता आला. या जनजागृतीपर पथनाट्याला खामगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा समाजप्रबोधनात्मक उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महाविद्यालयीन शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणे हे आमचे ध्येय आहे. ‘जागर स्त्रीशक्तीचा’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश थेट समाजापर्यंत पोहोचवला असून अशा उपक्रमांतूनच जबाबदार व संवेदनशील नागरिक घडतात.” पथनाट्य सादरीकरणासाठी निघालेल्या संघास मा. डॉ. सुभाषजी बोबडे (अध्यक्ष) व मा. डॉ. प्रशांतजी बोबडे (सचिव) यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महिला सक्षमीकरण विभागाच्या समन्वयक प्रा. डॉ. रेश्मा मारवाडी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली. तसेच महिला सक्षमीकरण विभागाचे सदस्य प्रा. सुहास पिढेकर, प्रा. अमित शिंदे, प्रा. दत्तात्रय भुतेकर, प्रा. जयश्री हेडा, प्रा. रुचिका कारंजकर व प्रा. वैष्णवी साहू यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी प्रा. संगीता वायचाळ, प्रा. डॉ. अनुराग बोबडे, प्रा. रविंद्र चव्हाण, प्रा. अनिता बोबडे, प्रा. पूजा टेंकाळे, प्रा. पायल भंसाली, श्री. विठ्ठल चंदनकार व श्री. अभय मोहिते यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनत, आत्मविश्वास व अभिनय कौशल्याच्या जोरावर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सशक्त अभिनयामुळे पथनाट्य अधिक प्रभावी ठरले. या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला असून स्त्रीविषयक प्रश्नांबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली आहे.