विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; खामगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांचे आवाहन
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव:- स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे (माजी नगराध्यक्ष, न.प. खामगाव तसेच माजी अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या स्मृतिदिनानिमित्त गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने टिळक स्मारक येथे दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शन व विक्री (Exhibition cum Sale) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, समाजसेवा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. बाबासाहेब बोबडे यांनी दिलेले मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहावे व त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर स्वावलंबन, शिस्त, सामाजिक बांधिलकी व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या विचारांना अभिवादन म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना देणारे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या दोन दिवसीय उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण, उपयुक्त व आकर्षक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रदर्शनीत विविध प्रकारचे चविष्ट व घरगुती नाश्त्याचे तसेच खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्सही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये गरमागरम भाज्यांचे व टोमॅटो सूप, सर्वांच्या आवडीची पावभाजी, पारंपरिक ग्रामीण चवीची भाकरी–ठेचा, कुरकुरीत साबुदाणा वडा, चटपटीत पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, वडा–पाव, मिसळपाव, पोहे, उपमा तसेच इतर अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. घरगुती चव व पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणारे हे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत. या प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीच उभारले असून उत्पादन निर्मितीपासून विक्री, आर्थिक नियोजन तसेच व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः स्वीकारली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव मिळणार असून त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण व स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होणार आहे. या उपक्रमाबाबत विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संचालिका व कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व उद्योजकीय क्षमतेला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव मिळणार असून त्यांच्या भविष्यातील उद्योजकतेची भक्कम पायाभरणी होईल.” विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला समाजासमोर मांडण्यासाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे न राहता भविष्यात नोकरी देणारे उद्योजक बनतील.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांना रोजगाराभिमुख दृष्टिकोन प्राप्त होतो.” महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व त्यांना योग्य प्रोत्साहन मिळावे, यासाठी खामगाव शहर व परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या दोन दिवसीय प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या विद्यार्थी उत्पादन प्रदर्शन व विक्री उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे व त्यांच्या उद्योजकीय प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे व प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. विविध नाविन्यपूर्ण व उपयुक्त उत्पादनांनी सजलेले हे प्रदर्शन खामगावकरांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.