पतंगोत्सवातून सृजनशीलता, समानता व सामाजिक जबाबदारीचा संदेश – सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे
शिक्षणातूनच स्त्री–पुरुष समानतेचा मार्ग मोकळा – प्रकाशजी तांबट


प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह (दि. ३ ते १२ जानेवारी २०२६) या विशेष सप्ताहांतर्गत “जी. एस. पतंगोत्सव” दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (सदस्या, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर होते. सप्ताह कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी तर “जी. एस. पतंगोत्सव” या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून प्रा. कोमल काळे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक जागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या प्रेरणादायी दिनांचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पतंगोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पतंग सजावट, पतंग संदेश व घोषवाक्य, तसेच पतंग उडविणे अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. प्रकाशजी तांबट यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा, असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या मनोगतात पतंगोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, संघभावना व समानतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचत असल्याचे नमूद केले. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत इको–फ्रेंडली पतंग व कॉटन मांजाचा वापर केल्याबद्दल त्यांनी आयोजक समितीचे विशेष कौतुक केले. तसेच अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश व्यापक स्तरावर जातो आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ होते, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालासाहेब टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उमेश खंदारे यांनी केले. हा कार्यक्रम सौ. श्रद्धाताई बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. पतंगोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या व प्रकारांच्या अनेक पतंग सादर केल्या. त्यानंतर महाविद्यालयाच्या मैदानावर सर्व विद्यार्थी एकत्र येऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमात पर्यावरणपूरक पतंग व कॉटन मांजा यांचाच वापर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. बालासाहेब टकले, प्रा. उमेश खंदारे, प्रा. मनोज बाभळे, डॉ. अनुराग बोबडे, डॉ. आशिष पटोकार, प्रा. नैना मिश्रा, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते, श्री. विठ्ठल चंदनकर, श्री. नरेंद्र वाघ, रोहित भोजने व धनराज अहीर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



