पालकमंत्री सुनेत्राताईंची गटनेते खुर्शीद आलम यांनी घेतली भेट
अल्पसंख्यांक संरक्षण कायदा, बार्शी नाका रेल्वे स्टेशन, वाढीव निधी, मोमीनपुरा पुल यासह 16 मागण्यांचे दिले निवेदन
बीड (प्रतिनिधी)- राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन नगर पालिकेचे गटनेते खुर्शीद आलम यांनी बीड शहरातील विविध 16 महत्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी खुर्शीद आलम यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून सदरील प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी केली.
बीड येथील न.प.चे गटनेते खुर्शीद आलम यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना बीड शहरातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक संरक्षण कायदा करण्यात यावा, टी.व्ही.वरील हिंदू मुस्लीम समाजावर डिबेट बंद करून सोशल मिडियावर जातीयवादी पोस्ट बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, पेठ बीड येथे सुसज्ज इमारत तयार असून त्याठिकाणी 50 खाटांचे रूग्णालय मंजुर करावा, बार्शी नाका सब रेल्वे स्टेशनचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, बीड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी वाढीव निधी देण्यात यावा, बीड शहरात खासबाग देवी मंदीर ते मोमीनपुरा पुल बांधण्यात यावा. अंगणवाड्या वाढवण्यात याव्यात, कंकालेश्वर मंदीर-मोमीनपुरा नाल्याच्या बाजूने रस्ता व संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी. अल्पसंख्यांक गर्ल्स हॉस्टेल मंजुर असून त्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे. कंकालेश्वर मंदीर ते सफीलपर्यंत पुल बांधुन सफीलच्या बाजूने रस्ता करून नर्सरी रोडला जोडण्यात यावा. बीड शहरातील पाणी, स्वच्छता, लाईट, रस्ते, नाल्या या संदर्भात न.प.मुख्याधिकार्यांना आदेशित करावे. राजमाता जिजाऊ उद्यानचे सुशोभिकरण करण्यात यावे. प्रत्येक प्रभागाला समान विकास निधी द्यावा आदि मागण्यांचे निवेदन गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी दिले आहे.


