बीड। प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात कोटी रूपये किमतीची ऑडीकार सापडल्यानंतर तिचा मालक कोण असा प्रश्न पडला होता. परंतू ग्रामीण पोलिसांनी गाडीचे चिसीनंबर देवून आरटीओलाच मालकाचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानुसार तब्बल 15 ते 20 दिवसानंतर त्या ऑडीचा मालक हे कुटे असल्याचे पत्र आरटीओने बीड ग्रामीण पोलिसांना दिले आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात आणि गाडी गाळ्यात गेली कशी याचा काय तपास करतात हेच पहावे लागेल.
तिरूमला ऑईल इंड्रस्ट्रीजपासून जवळच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कुलूप बंद गाळ्यात कोट्यावधी रूपये किमतीची ऑडीकार आणि काही मशिनरी असल्या संदर्भातील माहिती गाळा मालकानेच बीड ग्रामीण पोलिसांना दिली होती. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना गाडी सापडली पण मालक मात्र सापडलेला नव्हता. काही दिवसानंतर कोटी रूपये किमतीच्या गाडीला लाख रूपये किमतीच्या गाडीने टोचन देवून सदर गाडी ग्रामीण पोलिसांच्या दारात लावण्यात आली. या प्रकरणी गाडीचा मालक शोधण्यासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोदिराज यांनी आरटीओ कार्यालयाला पत्र व्यवहार करत गाडीच्या चिसीनंबर वरून मालक शोधून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने सदरची गाडी कुटे यांच्या मालकीची असल्याचा अहवाल बीड ग्रामीण पोलिसांना दिला आहे. परंतू आता प्रश्न असा निर्माण होतो की, कुटेंची गाडी गाळ्यात गेली कशी, नेली कोणी याचा तपास आता पोलिसांनाच करावा लागणार आहे.


