सत्तेवर असो वा नसो, आम्ही सेवाकार्यच करतो
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे प्रतिपादन; बीडमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
बीड (प्रतिनिधी)
दि.२६ : शहरातून गेल्या दोन-तीन दिवसांपासून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वातावरण चांगले झाले आहे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारे उमेदवार दिल्यामुळे मतदारांचाही पाठिंबा मिळतो आहे. मात्र, दुर्दैवाने काहीजण अपप्रचार करून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही सत्तेवर असो वा नसो सेवाकार्य करतच आहोत. त्यामुळे मतदार आमच्या पाठीशी उभा राहतील, असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या कॉर्नर सभांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती रवींद्र घुमरे यांच्या समर्थनार्थ प्रत्येक प्रभागात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा संपर्क सुरू झाला आहे. आज प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक एक येथे त्यांच्या कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. कपिल मुनी मंदिराच्या शेजारी असलेल्या अंकुश नगर भागात झालेल्या सभेत मतदारांचा मोठा प्रतिसाद होता. तसेच प्रभाग क्रमांक एकमध्येही जयदत्तअण्णा येणार या प्रतीक्षेत मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती रवींद्र घुमरे यांच्यासह उभे असलेल्या प्रभागातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बीड शहरात आम्ही जाती-धर्माला कधीच थारा दिला नाही आणि नेहमी विकासाच्या मुद्द्यावरच बोलतो. आम्ही कधी कुणावर टीकाही करत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून आम्ही काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून स्पष्ट होते की, गेल्या अनेक वर्षांपासून मी बीड शहराच्या संपर्कात आहे. विकासाची कामे केल्यामुळेच बीडची जनता आम्हाला स्वीकारते. अत्यल्प उत्पन्न असतानाही बीड नगरपालिकेचा कारभार व विविध योजना सुरू ठेवण्यात आल्या. बीड शहरात झालेली कामे आजही ठळकपणे दिसून येतात.
बीडचा मतदार सुज्ञ असून कोण चांगला आणि कोण कामाचा आहे, हे तो ओळखतो. बीड पालिकेला दुरुस्त करायचे असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक १२ आणि प्रभाग क्रमांक १ मधून उभे असलेल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. तसेच संपूर्ण बीड शहरातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने विजयी करून त्यांना सेवेची संधी द्यावी. विश्वास ठेवा, आम्ही दिलेला शब्द पाळतो. मतदान करून नागरिकांनी आपले कर्तव्य बजावावे. जय-पराजय सुरूच राहतो, पण शहराचा कौल हा नेहमी चांगल्याच बाजूने असतो. त्यामुळे बीड शहरातील आमचे सर्व नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. सोंग-ढोंग करून निवडणूक लढता येत नाही. भूलथापांना बळी पडून ही निवडणूक जिंकता येईल, असा जर कुणाचा भ्रम असेल, तर त्यांनी तो विसरावा. सत्ता असो वा नसो, आम्ही सेवाकार्य करतच आहोत. त्यामुळे मतदारांनी सर्व उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्यावे.
यावेळी डॉ. ज्योती रवींद्र घुमरे, डॉ. सारिका क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, अरुण डाके, बाबुशेठ लोढा, अरुण बोंगाणे, सखाराम मस्के, रूपसिंह परदेशी, गौतम सोनवणे, अर्जुन बहिरवाड, आजिनाथ सोनवणे, दादासाहेब नरवणे, अंबादास गुजर, राहुल आघाव, संजय होळकर, सुभाष क्षीरसागर, चंद्रकांत पेंढारे, अशोक कुलकर्णी, नवनाथ कुलकर्णी तसेच प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार साहस आदोडे, पूजा राजाभाऊ गुजर, प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार परमेश्वर धारकर, संगीता अशोक लोढा व प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


