पोकळ आश्वासनं नको; लिखित वचन देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या
एस.एम.युसूफ यांचे मतदारांना आवाहन
बीड (प्रतिनिधी) – बीड नगर परिषद साठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निवडणुकीत बीड शहरातील तीन कामे करण्याचे आश्वासन नाही तर लिखित वचन देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या नसता पुन्हा या तिन्ही प्रश्नांसाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत नुसती वाट पहात बसावे लागेल याचे भान असू द्या असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहरातील खासबाग-मोमीनपुरा हे दोन मोठे भाग जोडण्याकरिता बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण, शहराची ओळख असलेले ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण व सुशोभीकरण आणि मोमीनपुरा भागातील ऐतिहासिक महेदवीया दायरा च्या संरक्षक भिंती बांधणे.
या तिन्ही प्रश्नी गेल्या काही वर्षांपासून शासन-प्रशासनासह बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा यापैकी एकही प्रश्न राजकारणी शासन असो की प्रशासन की पालकमंत्री कोणीही अद्याप पर्यंत सोडविले नाही. प्रशासनिक अधिकारी मग ते जिल्हाधिकारी असो, मुख्याधिकारी असो की तहसीलदार असो अशा प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा पाहायला तयार नाहीत.
दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याने राजकारणी आमदार यांनी बीड शहरवासियांसाठी हे प्रश्न सोडविणे आवश्यक असून सुद्धा गेल्या सात वर्षात या प्रश्नांविषयी प्रसिद्धी माध्यमातून फक्त गवगवा केला. यात पुलाच्या निर्माणासाठी काही वेळा बिंदुसरा नदीत चक्कर मारून पुलनिर्माणाचा आव आणला व आणत आहेत.
आमदारांनी महेदवीया दायरा कब्रस्तान चा पाहणी दौरा करून कब्रस्तानच्या संरक्षक भिंती बांधून देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या माजी आमदारासह अनेकांच्या उपस्थितीत दिले होते. त्याला आता तीन वर्षे झाली आहेत. तरीही या कब्रस्तानच्या संरक्षक भिंती अजून बांधून दिल्या नाहीत.
बीडचे आमदार असूनही ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या प्रश्नांकडे आजपर्यंत ढुंकून सुद्धा पाहिले नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच कारंजा टॉवरच्या बाजूला असलेल्या चहाच्या हातगाड्यावर जाऊन त्यांनी माजी आमदार व कार्यकर्त्यांसह चहाचा आस्वाद घेतला. या सर्व बाबी पाहता हे तिन्ही प्रश्न असणाऱ्या प्रभागातील मतदारांनी या तिन्ही प्रश्नांसाठी शासन-प्रशासनासमोर उभे राहून लढा देण्याची धमक असलेल्या उमेदवारांनाच या प्रभागातून नगरसेवक पदी निवडून द्यावे.
तसेच हे तिन्ही प्रश्न सोडविण्याचे पोकळ आश्वासन नव्हे तर ही तिन्ही कामे प्राधान्याने करण्याचे लिखित वचन देणाऱ्या उमेदवारालाच नगराध्यक्ष पदी निवडून द्या नसता पुन्हा या तिन्ही प्रश्नांसाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत नुसती वाट पहात बसावे लागेल याचे भान असू द्या. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी केले आहे.


