**अलहुदा उर्दू शाळेच्या तीन शिक्षकांची 307 प्रकरणातून निर्दोष मुक्तता
- शाळेतील अंतर्गत वादातून दाखल खोटा गुन्हा न्यायालयात कोसळला**
बीड :
अलहुदा उर्दू प्राथमिक शाळा , बीड येथील तीन शिक्षकांवर डिसेंबर 2015 मध्ये दाखल करण्यात आलेला गंभीर फौजदारी कलम 307, 323,427, 506, 34 कलमांचा गुन्हा अखेर न्यायालयात टिकू शकला नाही. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात तिन्ही शिक्षकांना मा .जिल्हा प्रधान न्यायाधीश बीड यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलहुदा उर्दू प्राथमिक शाळा,बीड ही शाळा नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचलित असून, बीड शहरातील एक नामांकित उर्दू प्राथमिक शाळा आहे. मागील अनेक वर्षापासून शिक्षक विरुद्ध मुख्याध्यापक व संस्थे मध्ये न्याय हक्कासाठी लढा सुरू होता. वरील या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक मोमीन अब्दुल जफर अब्दुल अजीज यांनी फिर्यादी म्हणून शाळेच्या तीन शिक्षक सय्यद मोहम्मद नदीम, कादरी परवेज, आणि मिर्झा शारेख बेग यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस स्टेशन येथे डिसेंबर 2015 मध्ये गुन्हा नोंदवला होता. तक्रारीत तिन्ही सहशिक्षकांना आरोपी ठरवण्यात आले होते.
5 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश (Principal District and Sessions Judge ) मा.यावलकर साहेबांनी निकाल देताना, फिर्यादीकडून कोणतेही ठोस पुरावे सिद्ध न झाल्याने तिन्ही शिक्षकांची निर्दोष मुक्तता जाहीर केली.
या प्रकरणात फिर्यादींची बाजू अॅड. एस. व्ही. सुलाखे यांनी मांडली. आरोपी पैकी मोहम्मद नदीम व कादरी परवेज यांची बाजू अॅड. मंगेश पोकळे , तर मिर्झा शारेख बेग यांची बाजू अॅड. भीमराव चव्हाण यांनी युक्तिवादातून प्रभावीपणे सिद्ध केली.
या दोन्ही बचाव पक्षाच्या वकिलांनी पुरावे, साक्षी आणि घटनाक्रमाचे बारकाईने विश्लेषण करून न्यायालयासमोर वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानेच आरोपी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.शाळेतील अंतर्गत वाद-विवादातून हा बनावट गुन्हा उभारण्यात आला असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयात स्पष्ट केले. त्यांच्या संयमित, कायदेशीर ठोस मांडणीचे आणि युक्तिवाद चे कोर्टात विशेष कौतुक होत आहे.
शेवटच्या दशकभरात खाजगी शिक्षण संस्थांमधील, अन्याय, वाद आणि अंतर्गत संघर्ष ही नेहमीची समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बनावट गुन्हा नोंदवण्यामध्ये काही संस्थात्मक घटकांनीही सहकार्य केले होते, अशी माहिती समोर आली. या सर्व अडचणींवर मात करत तिन्ही शिक्षकांनी न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडून शेवटी हा खटला जिंकला.या निकालामुळे शिक्षकांच्या दहा वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळाला असून, सत्य आणि प्रामाणिकपणाचा विजय झाल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. खरंच आहे, “सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं!”


