शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अकोला येथे भव्य निःशुल्क वैद्यकीय शिबिराचे आयोजन
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे पक्षाचे मार्गदर्शक आणि देशातील ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहरात भव्य निःशुल्क वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारे हे शिबिर १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत के.एम.टी. हॉल, सुभाष रोड, अकोला येथे पार पडणार आहे.
पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून आयोजित या शिबिरामध्ये शहरातील व परिसरातील गरीब, गरजूंना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार, तपासणी व औषधोपचार दिले जाणार आहेत. शिबिरात फिजिशियन, सर्जन, हृदयरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांची टीम आपली सेवा देणार आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, CBC, KFT, LFT, HIV, HbA1c यांसह इतर आवश्यक रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येतील. तपासणीसोबतच गरजेनुसार औषधांचाही विनामूल्य पुरवठा केला जाईल. दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र सल्ला व मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आरोग्य जनजागृती वाढविण्यासाठी शिबिरात हृदयरोग प्रतिबंध, मधुमेह नियंत्रण, महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता, तसेच डोळ्यांच्या आजारावरील माहितीपर मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातील. वृद्ध नागरिक, महिलां व दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदेश संघटक सचिव जावेद ज़करीया आणि अकोला महानगर अध्यक्ष रफीक़ सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गट) यांनी केले आहे. “समाजातील कोणत्याही नागरिकाला आरोग्यसेवांपासून वंचित राहू देणार नाही, हा आमचा प्रयत्न आहे,” असे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरातील विविध विभागांमध्ये शिबिराविषयी माहिती देण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


