नागपूर अधिवेशनात अकोला सरकारी महिला रुग्णालयाच्या समस्यांकडे लक्ष वेधत जावेद ज़करिया यांचे आरोग्यमंत्रींकडे सविस्तर निवेदन
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
नागपूर :नागपूर येथे सुरू असलेल्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अकोला जिल्हा सरकारी महिला रुग्णालयातील गंभीर आणि वाढत्या समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रदेश संघटक सचिव जावेद ज़करिया यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयात सविस्तर व महत्वाचे लिखित निवेदन सादर करत या समस्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की अकोला शहर आणि जिल्ह्यातील गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी हे सरकारी महिला रुग्णालय अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक आरोग्यसेवा देणारी संस्था आहे. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत रुग्णालयातील प्रशासन, व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवांची स्थिती चिंताजनकरीत्या ढासळलेली आहे. याचा थेट फटका प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना, नवजात शिशूंना आणि तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या महिला रुग्णांना बसत आहे.
जावेद ज़करिया यांनी विशेषत: खालील गंभीर समस्या अधोरेखित केल्या :
रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना आजपर्यंत अधिकृत पदभार देण्यात आलेला नाही, ज्यामुळे प्रशासकीय निर्णयांमध्ये सातत्य व जबाबदारीचा अभाव दिसून येतो.
स्थायी प्रशासन अधिकारीची नियुक्ती न झाल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असून रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत.
अत्यावश्यक औषधांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे रुग्णांना खासगी मेडिकल स्टोअर्समधून जास्त पैसे खर्च करून औषधे खरेदी करावी लागत आहेत. यामुळे गरीब व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांवर आर्थिक बोजा वाढत आहे.
स्वच्छता व देखभाल व्यवस्थेची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.
प्रसूती विभागातील बेडची कमतरता, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि अत्यावश्यक उपकरणांची अनुपलब्धता यामुळे रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
नवजात बालसंगोपन विभागातील (NICU) सुविधांमध्ये सुधारणेची तातडीची गरज असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
निवेदनातून ज़करिया यांनी आरोग्यमंत्रींकडे पुढील महत्वाच्या मागण्या ठेवल्या :
वैद्यकीय अधीक्षकांना तातडीने अधिकृत पदभार देणे.
स्थायी प्रशासन अधिकारीची त्वरित नियुक्ती करणे.
आवश्यक सर्व औषधांचा नियमित, पुरेसा आणि मोफत पुरवठा सुनिश्चित करणे.
स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची पूर्तता त्वरित करणे.
प्रसूती व नवजात शिशू विभागातील सुविधा अद्ययावत करून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुधारणा करणे.
रुग्णालयातील एकूणच व्यवस्थापनावर उच्चस्तरीय चौकशी करून सुधारणा करण्याचे निर्देश देणे.
मंत्री महोदयांच्या कार्यालयाने हे निवेदन स्वीकारले असून संबंधित अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशी व तातडीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जावेद ज़करिया यांनी विश्वास व्यक्त केला की राज्य सरकार या गंभीर समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने उपाययोजना करेल. स्थानिक नागरिक, महिला संघटना व सामाजिक संस्थांनी जावेद ज़करिया यांनी पुढे केलेल्या मुद्द्यांचे स्वागत केले असून अनेकांनी हे पाऊल उशीराने का होईना, पण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. अकोला महिला रुग्णालयातील दयनीय स्थिती सुधारण्यासाठी या निवेदनामुळे सरकारकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


