एशिया न्यूज बीड

अकोला जिल्ह्यात ‘उम्मीद पोर्टल’वर वक्फ मालमत्तांची शंभर टक्के नोंदणी — राज्यात आदर्श ठरलेले काम

अकोला जिल्ह्यात ‘उम्मीद पोर्टल’वर वक्फ मालमत्तांची शंभर टक्के नोंदणी — राज्यात आदर्श ठरलेले काम

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

अकोला : अल्पसंख्याक मंत्रालय, भारत सरकार यांनी सुरू केलेल्या ‘उम्मीद पोर्टल’वरील वक्फ मालमत्ता नोंदणी मोहिमेत अकोला जिल्ह्याने राज्यभरात सर्वाधिक उल्लेखनीय अशी शंभर टक्के (100%) कामगिरी नोंदवत ऐतिहासिक यश मिळवले आहे. निश्चित केलेली अंतिम मुदत ५ डिसेंबर २०२५ येण्याआधीच जिल्ह्यातील सर्व वक्फ मालमत्तांची संपूर्ण नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, या कामगिरीने अकोला जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी कार्यप्रणालीचे आदर्श मॉडेल ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १२३५ वक्फ मालमत्ता पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६०८ मालमत्तांची पडताळणी (व्हेरिफिकेशन) यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून २१६ मालमत्तांना अंतिम मंजुरीही (अप्रूवल) प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्तांची शासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोंदणी प्रक्रियेतील अचूकता, वेग, सातत्यपूर्ण फॉलो-अप आणि तांत्रिक सुसूत्रता यामुळे अकोला जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक प्रगती साधली आहे. या उल्लेखनीय यशामध्ये जिल्हा वक्फ अधिकारी शेख इब्राहीम मुर्तुजा (अकोला–वाशिम) यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांनी जिल्ह्यातील विविध वक्फ संस्थांसोबत सातत्याने संपर्क ठेवत पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेसंबंधी संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहाय्यक म्हणून ज्युनियर असिस्टंट आकिब अहमद खान आणि सैय्यद मुजम्मिल अली यांनी तांत्रिक सहाय्य, दस्तऐवज पडताळणी व डेटाअपलोडिंगसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. याशिवाय, ह्या मोहिमेत अनेक स्वयंसेवी सामाजिक संघटनांचा सहभाग निर्णायक ठरला. रोटी बँकचे डॉ. ज़ुबेर नदीम, डॉ. मुजाहिद, मोहसिन सर, रियाज अहमद खान, राहील अफसर आणि मुहम्मद सामी यांनी शहर व जिल्ह्यात जागरूकता शिबिरे, मार्गदर्शन बैठका आणि ऑन-साइट हेल्प डेस्क आयोजित करून संस्थांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत केली. कच्छी मेमन जमात, अकोलाचे अध्यक्ष जावेद ज़करिया यांनी विविध ट्रस्टना आवाहन करून नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मुफ्ती अशफाक कासमी यांनी वक्फ नोंदणीचे कायदेशीर महत्त्व ट्रस्टसमोर स्पष्ट केले आणि तांत्रिक प्रक्रियेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले. अकोला जिल्ह्याने मिळवलेली ही शंभर टक्के 100% नोंदणीची कामगिरी प्रशासन, वक्फ विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण म्हणून समोर येत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांनीही अकोल्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याचा अवलंब करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *