नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी ३१ डिसेंबरला करावी – एस.एम.युसूफ़
बीड (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी ही २१ डिसेंबरला होणार आहे. या ऐवजी ३१ डिसेंबरला मतमोजणी करावी अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, नगरपालिका निवडणूकीसाठी अनेक वर्षांचा विलंब व प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात एकदाचे मतदान झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार होती परंतु कुठे माशी शिंकली माहित नाही. आता २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून आता २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. एव्हाना मतमोजणीला विलंब हा झालाच आहे तर अजून १० दिवसांचा विलंब करून ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी करावी. कारण या दिवशी इंग्रजांसारखेच आपल्याकडेही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जल्लोषाची तयारी केली जाते. देशी-विदेशी दारू ढोसण्यासाठी दारू प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात नियोजन केले जातात. सर्वसामान्य ही इंग्रजांच्या या नवीन वर्षाचा हर्षोल्लासात आनंद साजरा करतात. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो. सर्वांना इंग्रजांचे हे नवीन वर्ष आपलेसे वाटते. किती शोकांतिका आहे. आपल्याकडे मराठी नवीन वर्ष असो की इस्लामिक नवीन वर्ष असो, त्यांना ना हिंदू बांधव महत्त्व देतात, ना मुस्लिम बांधव. परंतु ३१ डिसेंबर आला की, सर्व जाती धर्माचे आपले भारतीय लोक मोठ्या प्रमाणात चेव आणून साजरे करतात. रात्रभर जागरण करून धिंगाणा घालतात. हाच प्रकार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर केला जातो. यामुळे २१ डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर तेच होणार आहे आणि ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत म्हणून सुद्धा तेच होणार आहे. याकरिता निवडणुकीची मतमोजणी ही ३१ डिसेंबर रोजीच करून निकाल जाहीर करावेत.
एरवी निवडणुका कोणत्याही असो निकाल लागल्यानंतर विजयी आणि पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची थोड्या अधिक प्रमाणात होतच असते तर कधी कधी ही बाचाबाची हाणामारी पर्यंत सुद्धा पोहोचते. ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी केल्यास निवडून आलेले उमेदवार व त्यांचे समर्थक विजयी झाले म्हणून दुहेरी जल्लोष आणि आनंद साजरा करतील तर पराभूत झालेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक सुद्धा पराभवाचे शल्य बाजूला ठेवून ३१ डिसेंबर च्या नवीन वर्षाचे स्वागत म्हणून जल्लोष आणि आनंद साजरा करतील. पर्यायाने भांडण-तंटे व्हायला जागाच राहणार नाही कारण सर्वांना डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल म्हणून २१ डिसेंबर ऐवजी ३१ डिसेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केल्यास यानिमित्ताने कधी नव्हे ते विजय आणि पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक असे सर्वचजण जल्लोष साजरा करताना दिसतील. अशाप्रकारे सर्वांनाच आनंद देण्याकरिता मतमोजणीची तारीख वाढवून २१ डिसेंबर ऐवजी ३१ डिसेंबर करावी अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.


