एकतेचा संदेश देत नागपूरमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
नागपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिवस नागपूर येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवन, सदर, नागपूर येथे करण्यात आले होते. या उपक्रमातून समाजात एकता, बंधुता, सामाजिक सलोखा आणि भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास माजी पोलीस अधिकारी डॉ. भूषण कुमार उपाध्याय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करत, विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मेहेरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया गुरव, निखिल कुसुमागर, हाजी फारुखभाई बावला, श्री मोईन मलक, श्री गुरमित सिंग खोखर, श्री परहीज गिमी, फादर रणजित रॉग्डिज यांच्यासह प्रशासन व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून, अशा कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेला “विविधतेत एकता” या विषयावरील सांस्कृतिक कार्यक्रम. गीत, नृत्य व नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतातील सांस्कृतिक वैविध्य, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समारोपप्रसंगी अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या शासनापर्यंत पोहोचवणे हे अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख कार्य आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास आयोगाशी निर्भयपणे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. एकूणच, अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून समावेशकता, परस्पर सहकार्य, सामाजिक सलोखा आणि घटनात्मक मूल्यांचा आदर यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. नागपूर शहरासाठी हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य दृढ करणारा व प्रेरणादायी ठरला.



